मूलतत्त्ववादी इस्लामला रोखण्याचा निर्धार व्यक्त करतानाच अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी, शरणार्थीची विचासरणी तपासण्यासाठी छाननी चाचणी घेण्यात यावी अशी सूचना मांडली आहे. जागतिक दहशतवादाचा पराभव करण्यासाठी स्थलांतरितांची तपासणी गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.  शीतयुध्दातील काळात वापरली जात होती तशी चाचणी शरणार्थीना प्रवेश देताना असली पाहिजे, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, देशाची उभारणी वगैरे गप्पा मारण्यापेक्षा नाटो व मध्यपूर्वेतील मित्र देशांच्या मदतीने जागतिक दहशतवादाचा पराभव केला पाहिजे. मला अध्यक्षपद मिळाले तर प्रशासनाला आयसिसला चिरडून टाकण्यासाठी संयुक्तपणे लष्करी मोहिमा राबवण्यास सांगितले जाईल व त्यांचा आक्रमकपणे पाठपुरावा केला जाईल. देशाची उभारणी निर्णायक पातळीवर करताना नवीन दृष्टिकोनाचा अंगीकार केला जाईल. त्यात अमेरिकेतील दोन प्रमुख पक्ष व मित्र देश, मध्यपूर्वेतील अमेरिकेचे मित्र देश यांचे म्हणणे विचारात घेतले जाईल. मूलतत्त्ववादी इस्लामचा पराभव करणे हा आमचा हेतू आहे, असे त्यांनी ओहिओ येथील भाषणात सांगितले. सर्व कृती या उद्दिष्टांना धरून असल्या पाहिजेत व हे उद्दिष्ट काही देशांना मान्य असेल, काहींना नसेल. आपण आपले मित्र नेहमीच निवडू शकतो असे नाही, पण आपले शत्रू आपल्याला ओळखता आले पाहिजेत. स्थलांतरित किंवा शरणार्थीना अमेरिकेत प्रवेश देण्यापूर्वी त्यांची कसून छाननी केली पाहिजे. त्यासाठी त्यांची विचारसरणी तपासणारी चाचणी असावी तरच दहशतवादाचा धोका टाळता येईल.आपल्या देशात आधीच अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे आणखी नवीन प्रश्न नको आहेत. शरियत कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी अमेरिकी कायदा पाळला पाहिजे, दहशतवाद्यांच्या सहानुभूतीदारांना स्थान मिळू नये यासाठी स्थलांतरितांची चाचणी आवश्यक आहे. जे लोक राज्यघटनेवर विश्वास ठेवत नाहीत व धर्माधतेवर विश्वास ठेवतात त्यांना देशात प्रवेश देता कामा नये, असे आपले मत आहे व अध्यक्ष झालो तर त्याची अंमलबजावणी केली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा