रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीसाठी उमेदवारी जवळपास निश्चित असलेले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी प्रसारमाध्यमांवर टीकेचे आसूड ओढले. आमच्या देशातील राजकीय पत्रकार कमालीचे अप्रामाणिक आहेत तसेच दूरचित्रवाणी पत्रकार लबाड व लुच्चे आहेत असे ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर प्रसारमाध्यम संस्थांकडून कडवट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.
न्यूयॉर्क येथे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्हाला वृत्तपत्रात बदनामीकारक बातम्या वाचायला मिळतात, लोकांना ज्या बातम्या कळतात त्या खोटय़ा असतात, प्रसारमाध्यमांवर मी टीका करीतच राहणार आहे.
वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमे विशेष करून राजकीय पत्रकार अप्रमाणिक आहेत. जानेवारीत आयोवा येथे एका रात्रीत ज्येष्ठांसाठी साठ लाख डॉलर्सचा निधी जमवल्याबाबत पत्रकारांनी केलेले आरोप त्यांनी खोडून काढले. फॉक्स न्यूजने आयोजित केलेली चर्चा टाळून त्यांनी ज्येष्ठांसाठी पैसे गोळा केले असा प्रसारमाध्यमांचा आरोप आहे. प्रसारमाध्यमांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी चांगल्या कामासाठी वाईट प्रसिद्धी दिली, राजकीय पत्रकार फार अप्रमाणिक आहेत.
एबीसी न्यूजचे पत्रकार टॉम लामास यांना त्यांनी सांगितले की, तुम्ही लबाड लुच्चे आहात तुम्हाला खरे काय ते माहिती असते पण तुम्ही ते सांगत नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्रसारमाध्यम संघटनांनी व विरोधी उमेदवारांनी ट्रम्प यांना धारेवर धरले.
व्हाइट हाऊस वार्ताहर संघटनेने वृत्तपत्र स्वातंत्र्यावर टीकेचा निषेध केला. एखादा अध्यक्षीय उमेदवार जर भाषण व वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने आणण्याची भाषा करीत असेल तर त्याचा आम्ही विरोध करतो असे त्यांनी म्हटले आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी सर्वावरच टीका केली आहे. ते सर्वावर टीका करतात त्यांना केवळ दुसऱ्यांवर टीका व अपमान करणे समजते. एमएसएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, माझी सर्व कारकीर्द लोकांपुढे आहे. अमेरिकी जनता योग्य पर्याय निवडेल यावर माझा विश्वास आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा