Donald Trump on Pahalgam: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याआधी त्यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहेच. त्यानंतर शुक्रवारीही त्यांनी हा हल्ला वाईट असल्याचे म्हटले. रोमच्या दौऱ्यावर जात असताना एअर फोर्स वनच्या विमानात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमधील तणावाबाबत भाष्य केले.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमीच संघर्षपूण तणाव राहिला आहे. दोन्ही देश या ना त्या मार्गाने आपापसातील प्रश्न सोडवतील.

“माझ्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश जवळचे आहेत. हजारो वर्षांपासून ते एकमेकांशी भांडत आहेत. काश्मीरचा प्रश्न हजारो किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांपासून प्रलंबित आहे. पण पहलगामवर झालेला हल्ला वाईट होता”, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. एएनआय वृत्तसंस्थेने या प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत-पाकिस्तान सीमेवर १,५०० वर्षांपासून संघर्ष सुरू असून तो आजही कायम आहे. पण मला खात्री आहे की, ते यातून मार्ग काढतील. मी दोन्ही देशांच्या नेत्यांना ओळखतो. भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच तणाव राहिलेला आहे.