दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात अयशस्वी ठरलेल्या पाकिस्तानला अमेरिकेतील ट्रम्प सरकारने पुन्हा एकदा जोरदार झटका दिला आहे. याचवर्षी ट्रम्प प्रशासनाने संरक्षण गुंतवणुकीसंबंधीचे विधेयक संमत केले असून यामध्ये पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या संरक्षण निधीमध्ये कपात केली होती. दरम्यान रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तान लष्कर अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये कपात केली आहे. भारताने नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान आपल्या जमिनीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी वापरत असल्याचं म्हटलं आहे.

तसं पहायला गेल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर भारताचा दबाव वाढत असल्याचं दिसत आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, लष्कर प्रशिक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रम गेल्या एक दशकापासून द्विपक्षीय लष्कर संबंधाचं प्रतिक राहिलं आहे. ट्रम्प सरकारच्या निर्णयावर अमेरिका आणि पाकिस्तान दोन्हीकडून सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. मात्र पाकिस्तान लष्कराने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

रिपोर्टनुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी आपली ओळख उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे की, या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील विश्वासार्हतेवर परिणाम होईल. दुसरीकडे पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून निर्णयावर प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे पाकिस्तानी लष्कर लीडरशीप ट्रेनिंगसाठी रशिया किंवा चीनकडे जाऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे.

अमेरिकन संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या ६६ अधिकाऱ्यांची संधी हिरावली गेली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी अधिकाऱ्यांची जागा भरण्यासाठी दुसऱ्या देशातील अधिकाऱ्यांना संधी देण्यात येईल.