चार महिन्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचे समर्थनही केलं आहे. त्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, बायडेन यांच्या निर्णयानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे.
जो बायडेन यांनी त्यांचा निर्णय जाहीर करताच डोनाल्ड ट्रम्प यांनी सीएनएनला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी जो बायडेन यांच्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या उमेदवारीबाबतही टीप्पणी केली.
हेही वाचा – जो बायडेन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
जो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली, ते चांगलेच झालं. खरं तर ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष होते. ते राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी योग्य व्यक्ती नव्हते. मागच्या निवडणुकीत खोटं बोलून आणि खोटा प्रचार करून ते राष्ट्राध्यक्ष झाले, अशी टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
कमला हॅरिस यांचा पराभव करणं सोपं
पुढे बोलताना त्यांनी कमला हॅरिस यांच्या उमेदवारीबाबतही भाष्य केलं. जर डेमोक्रॅट्स पक्षाने कमला हॅरिस यांना उमेदवारी दिली, तर बायडेन यांच्या तुलनेत कमला हॅरिस यांचा पराभव करणं सोपं आहे, असे ते म्हणाले. तसेच आगामी निवडणुकीत आमच्या पक्षाचा विजय नक्कीच विजय होईल, असा विश्वासही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – जो बायडेन यांची अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार… पुढे काय होणार?…
जो बायडेन यांची राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार
दरम्यान, काल रात्री उशीरा अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. अमेरिका आणि माझा पक्ष यांच्या हिताच्या दृष्टीने मी हा निर्णय घेतला आहे असं बायडेन यांनी यांनी सांगितले. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या डिबेटदरम्यानही बायडेन यांना त्यांची भूमिका ठोसपणे मांडता आली नव्हती. काही दिवसांपूर्वी बायडेन यांना करोना संसर्ग झाला होता. या संसर्गामुळे श्वसनाचा त्रासही सुरू झाला होता. गेल्या काही महिन्यात सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना विस्मरण झाल्याचेही दिसलं होतं. गेल्या काही दिवसात डेमोक्रॅट्स पक्षातूनच बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी असे प्रयत्न सुरू होते. या सगळ्याची परिणती बायडेन यांच्या घोषणेत झाल्याचे दिसून येत आहे.