PM Narendra Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या प्रदीर्घ बैठकीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यात तहव्वूर राणाच्या भारताकडे प्रत्यार्पणाच्या मुद्द्यापासून अमेरिकेतून भारतात परत पाठवण्यात आलेल्या भारतीयांच्या मुद्द्यापर्यंत अनेक बाबींचा समावेश होता. या बैठकीनंतर मोदी व ट्रम्प यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मात्र, या बैठकीच्याही आधी मोदींशी भेट झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना एक विशेष गिफ्ट दिलं!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मिस्टर प्राईम मिनिस्टर, यू आर ग्रेट”!

डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतल्यानंतर त्यांच्या अनौपचारिक गप्पा रंगल्या. मोदींनी ट्रम्प यांची गळाभेट घेतली. यानंतर ट्रम्प यांनी स्वत:चं फोटोबुक ‘अवर जर्नी टुगेदर’ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिलं. या पुस्तकात डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा पहिला कार्यकाळ, त्यातील महत्त्वाच्या घटना यांचा समावेश करण्यात आला आहे. या फोटोबुकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर २०१९ मध्ये अमेरिका दौऱ्यावर असताना ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमातील फोटोंचाही समावेश करण्यात आला आहे.

स्वत: केली सही, काय लिहिला संदेश?

दरम्यान, बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना ते पुस्तक भेट म्हणून दिलं. या पुस्तकात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वहस्ताने मोदींसाठी संदेशदेखील लिहिला. यात “मिस्टर प्राईम मिनिस्टर, यू आर ग्रेट” (मिस्टर प्राईम मिनिस्टर, तुम्ही महान आहात), असा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पुस्तकाची काही पानं उलगडून त्या दोघांचे फोटोही दाखवले. त्यात ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातल्या त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान ‘नमस्ते ट्रम्प’ रॅलीतील फोटोदेखील समाविष्ट करण्यात आले होते. ‘ताज महल’जवळ ट्रम्प यांनी लेडी मिलेनिया ट्रम्प यांच्यासोबत काढलेल्या फोटोचाही यात समावेश आहे.

मोदींबद्दल ट्रम्प म्हणाले…

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुस्तकातल्या एका फोटोवर मोदींचं कौतुक करणारी कॅप्शन लिहिली आहे. “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत आले ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. ते बऱ्याच काळापासून माझे खूप चांगले मित्र आहेत. आमचे खूप चांगले संबंध असून गेल्या चार वर्षांत आम्ही ते कायम राखले आहेत”, असं ट्रम्प यांनी या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.