वकील मायकेल कोहेन यांचा दावा
अमेरिकेचे अध्यक्ष होण्याच्या काही वर्षे आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पोर्न अभिनेत्री स्टिफनी क्लिफोर्ड हिच्याबरोबर संबंध ठेवले होते व त्या प्रकरणात आपण पदरमोड करून १ लाख ३० हजार डॉलर तिला देऊ न प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण ट्रम्प यांनी ते पैसे परत दिले नाहीत असे त्यांचे व्यक्तिगत वकील मायकेल कोहेन यांनी सांगितले. हे पैसे प्रचारनिधीतून देण्यात आल्याचा आरोप अलीकडेच करण्यात आला होता, त्यामुळे कोहेन यांचे विधान हे ट्रम्प यांना वाचवण्यासाठीच आहे.
कोहेन यांनी सांगितले की, क्लिफोर्ड हिला मी पैसे दिले, त्यात ट्रम्प ऑर्गनायझेशन किंवा ट्रम्प प्रचार गटाने भाग घेतला नाही. ट्रम्प यांनी स्टिफनी यांच्या बरोबरचे त्यांचे प्रकरण मिटवताना दिलेले पैसे मला परत करणे आवश्यक होते, पण त्यांनी लबाडी करून पैसे दिलेच नाहीत. २०१६ मधील निवडणुकीच्या काही आठवडय़ांआधी कोहेन यांनी खासगी एलएलसी माध्यमातून क्लिफोर्ड हिला पैसे दिले. ट्रम्प यांनी क्लिफोर्ड उर्फ स्टॉर्मी डॅनियल्स हिला पैसे दिले होते, कारण त्या वेळी ट्रम्प यांचे जुलै २००६ मधील तिच्याबरोबरचे संबंध उघड झाले होते. कोहेन यांनी पैसे दिल्याची बातमी पहिल्यांदा ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ने दिली होती. ट्रम्प यांनी या अभिनेत्रीशी लैंगिक संबंध ठेवल्याचा इन्कार केला होता. कॉमन कॉज या संघटनेने संघराज्य निवडणूक आयोगाकडे तसेच न्याय खात्याकडे तक्रार करून असा आरोप केला होता की, ट्रम्प यांचे लैंगिक संबंधाचे प्रकरण मिटवण्यासाठी पैसे देताना प्रचार निधी नियमांचे उल्लंघन झाले, पण कोहेन यांनी हा आरोप फेटाळला असून तो व्यवहार कायदेशीर होता व त्यात प्रचारासाठीचा पैसा वापरला नव्हता असा खुलासा केला आहे. ट्रम्प यांच्यावतीने पैसे का दिले असे विचारले असता त्यांनी सांगितले की, मी नेहमीच ट्रम्प यांचे संरक्षण केले आहे. त्यामुळे त्यांचे प्रकरण आणखी चिघळू नये म्हणून पैसे दिले पण याचा अर्थ त्यांचे पोर्न अभिनेत्रीशी संबंध असल्याचे प्रकरण खरे होते असे म्हणता येणार नाही. कारण अनेकदा खोटय़ा प्रकरणांमुळेही बदनामी होतच असते. ती टाळण्यासाठी तिला पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.