अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी स्पर्धेत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कॅरोलिनात विरोधकांवर मात करीत प्राथमिक फेरीतील लढत जिंकली आहे तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय स्पर्धक हिलरी क्लिंटन यांनी नेवाडात बर्नी सँडर्स यांच्यावर मात करीत पुन्हा रंगत आणली आहे.
ट्रम्प यांनी न्यूहॅम्पशायरमध्ये याच महिन्यात विजय मिळवला होता व आयोवात त्यांचा दुसरा क्रमांक लागला होता. स्थावर मालमत्ता जगातील बडे प्रस्थ असलेले ट्रम्प यांनी नेवाडात विजय मिळवला आहे. १ मार्चला मंगळवारी आणखी महत्त्वाच्या लढती होत आहेत.
दक्षिण कॅरोलिनातील विजयानंतर ट्रम्प यांनी सांगितले की, मी जनतेचा आभारी आहे. माझ्या विजयामुळे ही खास रात्र आहे. अध्यक्षपदाची उमेदवारी मिळणे सोपे नाही. त्यांची पत्नी मेलानिया हिने सांगितले की, माझ्या पतीला मी शुभेच्छा देत आहे. कारण त्याने खूप परिश्रम केले आहेत. ट्रम्प यांना ३२.५ टक्के मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर रूबियो यांना २२.५ टक्के मते मिळाली तर क्रूझ यांना २२.३ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेवाडातील प्राथमिक फेरीत हिलरी क्लिंटन यांनी विजय मिळवल्याने त्यांच्या समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यांनी सँडर्स यांच्यावर निसटता विजय संपादन केला आहे. क्लिंटन यांनी सँडर्स यांचा ५ टक्के जास्त मते मिळवून पराभव केला. या विजयाने मी रोमांचित झाले व समर्थकांची मी आभारी आहे असे त्यांनी सांगितले. न्यूहॅम्पशायरमध्ये क्लिंटन यांना सँडर्स यांनी पराभूत केले होते.
त्यांच्या विजयाने सँडर्स यांचा झंझावात रोखला गेला आहे. २७ फेब्रुवारीला डेमोक्रॅटिक पक्षाची प्राथमिक फेरी दक्षिण कॅरोलिनात होणार आहे. रिपब्लिकन पक्षात ट्रम्प, रूबियो व क्रूझ यांच्यात चुरस आहे.
जेब बुश यांची अखेर माघार
कोलंबिया : अमेरिकी अध्यक्षीय उमेदवारीच्या स्पर्धेत रंग भरत असतानाच प्राथमिक फेरीतील काही निराशाजनक पराभवांमुळे रिपब्लिकन पक्षाचे जेब बुश यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे बुश कुटुंबाला तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता आता पूर्णपणे संपली आहे.
दक्षिण कॅरोलिनात रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक लढतीत त्यांचा चौथा क्रमांक लागला त्यामुळे ते नाराज होते. काहीसे अंतर्मुख पण शिस्तबद्ध असलेले जेब बुश यांना पैशाची कमी नव्हती, देशात त्यांना मोठा पाठिंबाही होता, पण तरी त्यांना काही पराभवांना सामोरे जावे लागले. त्यांचे वडील जॉर्ज एच. डब्ल्यू बुश व मोठे बंधू जॉर्ज डब्ल्यू बुश हे अमेरिकेचे अध्यक्ष होते, जेब बुश यांना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळून ते अंतिम निवडणूक जिंकले असते तर बुश कुटुंबाला तिसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मान मिळाला असता.
१९८९ ते १९९३ जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश हे अध्यक्ष होते त्यानंतर त्यांचे पुत्र जॉर्ज डब्ल्यू बुश हे २००१ ते २००९ दरम्यान अध्यक्ष होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा