Donald Trump Reciprocal Tariffs: गेल्या १५ दिवसांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लागू केलेला आयात कर अर्थात Reciprocal Tariff तब्बल ८ पट वाढवला आहे. व्हाईट हाऊसनं मंगळवारी उशीरा जारी केलेल्या परिपत्रकामध्ये यासंदर्भातला उल्लेख करण्यात आला आहे. चीननं डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेवर १४५ टक्के आयात कर लागू केल्यानंतर त्यावर अमेरिकेकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यामुळे अमेरिका व चीन यांच्यातील या टॅरिफ वॉरमुळे दोन्ही देशांमध्ये मिळणाऱ्या वस्तू दिवसेंदिवस महाग होऊ लागल्याचं दिसत आहे.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार आता चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवर तब्बल २४५ टक्के व्यापार कर लागू असेल. “अमेरिकेत आयात होणार्या चिनी वस्तूंवर २४५ टक्क्यांपर्यंत व्यापार कर लागू असेल. चीनकडून उचलण्यात येणाऱ्या उर्मट पावलांचा परिणाम म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं हे पाऊल ‘व्यापारात अमेरिकेला सर्वोच्च प्राधान्य’ धोरणाचाच एक भाग आहे”, असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
ट्रम्प प्रशासनाचे चीनवर आरोप
दरम्यान, या परिस्थितीचं खापर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चीनवर फोडलं आहे. चीनकडून हेतुपुरस्सर तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या अनेक महत्त्वाच्या सामग्रींच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. यात गॅलियम, जर्मेनियम आणि अँटिमनी अशा गोष्टींचा समावेश आहे. लष्करी साहित्य, अवकाशविषयक साहित्य व सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी हे साहित्य अत्यावश्यक ठरतं, असं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. नुकतंच चीननं सहा प्रकारच्या दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवरदेखील अशाच प्रकारचे निर्बंध घातल्याचं ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे.
“या सगळ्या प्रकारातून अमेरिकेतली ऑटो उद्योजकांसाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबींचा पुरवठा खंडित करण्याचा चीनचा प्रयत्न आहे”, असंही या निवेदनात म्हटलं आहे.
आयात कर…वाढता वाढता वाढे!
चीन व अमेरिका यांच्यातील टॅरिफ वॉरचा परिणाम म्हणून दोन्ही देश एकमेकांवर लागू असणाऱ्या करात टप्प्याटप्प्याने वाढ करत आहेत. अमेरिकेकडून सर्वात आधी चीनवर ३४ टक्के समन्यायी व्यापार कर अर्थात रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यात ५० टक्क्यांची वाढ करून ते ८४ टक्के केलं. यानंतर १२४ टक्के, १४५ टक्के आणि आता थेट २४५ टक्क्यांपर्यंत हे कर वाढवण्यात आले आहेत.
दुसरीकडे चीनकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. “शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही उत्तर देत राहू”, असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्पष्ट केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ६८ टक्के असणारा आयात कर चीननं आता थेट १२५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.