अमेरिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत. डेमोक्रॅटीक पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ही निवडणूक होणार आहे. एकीकडे जो बायडन यांनी वार्धक्याच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घेऊन तरुण उमद्या नेत्याच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे; तर दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकताच जीवघेणा हल्ला झाल्याने ते जखमी झाले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राजकारण चांगलेच तापलेले असताना “देव माझ्या बाजूने” असल्याचे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : वार्धक्याची चिंता, त्यात करोनाची भर! वाढत्या दबावानंतर निवडणुकीतून माघार घेण्याबाबत बायडन ‘पॉझिटीव्ह’

हल्ल्यानंतर पहिल्यांदाच बोलायला उभे राहिले ट्रम्प

करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर जो बायडन आता निवडणुकीतून माघार घेण्याबाबत सकारात्मक असल्याचे वृत्त आहे; तर दुसरीकडे हल्ल्यातून सुखरुप बचावल्यानंतर रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. हल्ल्यानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प मिलवॉकीमध्ये बोलत होते. त्यांच्या जखमी झालेल्या कानाला पट्टी लावली होती. त्यांच्या काही समर्थकांनीही कानाला पट्टी लावून त्यांना समर्थन दिले. त्यांनी उपस्थितांसमोर म्हटले की, “आतापासून केवळ चार महिन्यांनंतर आपण एक अतुलनीय असा विजय साजरा करु.” पुढे त्यांनी मी फक्त अर्ध्या अमेरिकेचा नव्हे; तर संपूर्ण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असेन, असेही वचन दिले.

“…ही तर देवाची करणी”

जीवघेण्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच बोलायला उभे राहिले होते. शनिवारी (१३ जुलै) पेनसिल्व्हेनिया राज्यातील बटलर येथे ट्रम्प यांच्या ‘फार्म शो’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळाच्या बाहेर उंच ठिकाणी लपून बसलेल्या २० वर्षीय हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी चाटून गेली असून ते जखमी झाले आहेत. हल्लेखोराचा नेम चुकला नसता, तर थेट त्यांच्या डोक्यात गोळी लागण्याचा धोका होता. मात्र, ते त्यातून सुखरुप बचावले आहेत.

पहिल्यांदाच या हल्ल्याचे वर्णन करुन सांगताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “सगळीकडे रक्त सांडलं होतं. मात्र, निश्चितपणे मला फारच सुरक्षित वाटत होतं, कारण देव माझ्या बाजूने होता. जर मी माझे डोके त्या शेवटच्या क्षणाला अचूकपणे हलवले नसते तर कदाचित हल्लेखोराच्या गोळीने माझ्या डोक्याचा वेध घेतला असता; आणि जर असे झाले असते तर कदाचित आज मी तुमच्याबरोबर उभा नसतो.” पुढे ते म्हणाले की, “…तर कदाचित मी इथे उभा नसतो. मात्र, निव्वळ सर्वशक्तिमान देवाच्या कृपेने आज मी तुमच्यासमोर उभा आहे. बरेच लोकांनी असे म्हटले की, माझ्या वाचण्यामागे ईश्वराची करणी कारणीभूत आहे.” पुढे ट्रम्प म्हणाले की, “मी अर्ध्या अमेरिकेसाठी नव्हे तर संपूर्ण अमेरिकेसाठी अध्यक्ष होण्यासाठी जीवाचे रान करत आहे; कारण अर्धी अमेरिका जिंकण्यात काही अर्थ नाही.”

हेही वाचा : Donald Trump Attack : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अवघ्या २० वर्षीय तरुणाकडून गोळीबार, FBI ने पटवली ओळख!

बायडन माघार घेण्याची शक्यता, राष्ट्राध्यक्ष पदासाठी हॅरिस यांचे नाव पुढे

८१ वर्षाचे जो बायडन वार्धक्यामुळे बोलताना अडखळतात आणि चालताना धडपडतात. अशातच आता त्यांच्यासमोरचं संकट आणखी वाढलं असून त्यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे, ते राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेण्याच्या चर्चा अधिक जोर धरु लागल्या आहेत. आतापर्यंत माघार न घेण्याबाबत ठाम असलेले बायडनदेखील आता माघार घेण्याचा विचार करु लागल्याचे वृत्त आहे. पहिल्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये ते मुद्दे मांडण्यामध्ये फिके पडल्याने त्यांची उमेदवारी नाकारली जावी आणि नवा उमेदवार उभा करावा, असा एक मतप्रवाह डेमोक्रॅटिक पक्षामध्ये प्रबळ होऊ लागला. डेमोक्रॅटीक पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी स्पीकर नॅन्सी पेलोसी अशा मातब्बर नेत्यांकडूनही ही मागणी जोर धरु लागली आहे. राष्ट्राध्यक्ष पदासाठी जो बायडन यांच्याऐवजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump in first speech after assassination attempt i had god on my side vsh