एपी, अटलांटा : अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या वादाची पहिली फेरी गुरुवारी पार पडली. विद्यामान अध्यक्ष व डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आणि माजी अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प त्यामध्ये सहभागी झाले. यावेळी ट्रम्प यांना सामना करताना बायडेन अडखळत होते आणि मधूनमधून थांबत होते. दुसरीकडे बायडेन यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ट्रम्प यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था, बेकायदा स्थलांतर आणि २०२१मधील कॅपिलट हिलवरील हल्लाबोल यातील सहभाग याविषयी असत्य कथन केले.

हेही वाचा >>> गोहत्येवरून २४ जणांना अटक; मध्य प्रदेश पोलिसांची कारवाई, धार्मिक सलोखा बिघडवण्याचा हेतू

बायडेन ८१ वर्षांचे असून पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी त्यांचे वय जास्त आहे अशी चिंता अनेक अमेरिकी नागरिकांनी यापूर्वी व्यक्त केली आहे. वादाच्या पहिल्या फेरीत त्यांच्या निस्तेज कामगिरीमुळे नागरिकांमधील ही भावना वाढीला लागू शकते याबद्दल डेमोक्रॅटिक पक्षामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्याबरोबरच ट्रम्प यांच्या विजयाची भीती विचारात घेऊन बायडेन यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाजूला होण्यासाठी विनंती करण्याच्या मागणीनेही पुन्हा जोर धरला आहे.

दरम्यान, या वादादरम्यान ट्रम्प यांचे प्रक्षोभित करण्याचे प्रयत्न बायडेन यांनी वारंवार उधळून लावले. ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात न्यूयॉर्क कोर्टाने दोषी ठरवण्याची घटना किंवा त्यांनी पहिल्या जागतिक महायुद्धातील सैनिकांचा केलेला अपमान यासारख्या मुद्द्यांवरून बायडेन यांनी त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा २०२०च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल मान्य करण्यास नकार दिला. तसेच ‘कॅपिटल हिल’वर केलेला हल्लाबोल आपल्या संमतीने झाला नव्हता असा दावाही त्यांनी केला.