Donald Trump warns Vladimir Putin : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची रोममध्ये भेट घेतली. या भेटीनंतर ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत युक्रेनमध्ये नागरी भागांना लक्ष्य करत केलेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यावर टीका केली आहे.

“गेल्या काही दिवसांमध्ये नागरी भाग, शहरे आणि वस्त्यांमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचे पुतिन यांच्याकडे काहाही कारण नव्हते. मला असे वाटते की कदाचित त्यांना युद्ध थांबवण्याची इच्छा नाही, ते फक्त बोलणी पुढे रेटत आहेत आणि त्यांना ‘बँकिंग’ किंवा ‘दुय्यम स्वरुपाचे निर्बंध’ अशा वेगळ्या पद्धतींनी हताळावे लागेल, खूप जास्त लोक मरत आहेत!!!” असे ट्रम्प त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

ट्रम्प यांनी पुतिन यांना वेगळ्या पद्धतीने हाताळावे लागेल असे म्हटल्याने अमेरिका रशियावर आणखी निर्बंध लादू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या दरम्यान, क्रेमलिनने शनिवारी सांगितले की, मॉस्कोमध्ये शुक्रवारी अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांच्याबरोबर झालेल्या भेटीदरम्यान, पुतिन यांनी युक्रेनशी कोणत्याही पूर्व अटींशिवाय चर्चा करण्यास आपण तयार असल्याचे म्हटले आहे.

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराच्या आधी शनिवारी डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची रोममध्ये भेट झाली. फेब्रुवारी महिन्यात दोघांमध्ये ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या वादग्रस्त चर्चेनंतर त्यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती.

दोन्ही नेते याच दिवशी पु्न्हा भेटणार असल्याचे युक्रेनचे प्रवक्ते Serhii Nykyforov यांनी सांगितले. तर व्हाइट हाउस कम्युनेकेशन डायरेक्टर स्टीव्ह चेंग यांनी ही भेट अत्यंत सकारात्मक झाल्याचे म्हटले आहे. पण या भेटीबद्दल अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती देण्यात आली नाही.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धबंदीसाठी डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी असा करार प्रस्तावित केला आहे, ज्यामध्ये अमेरिका रशियाने क्रिमियावर मिळवलेल्या ताब्यात औपचारिक मान्यता देईल आणि पूर्व आणि दक्षिण युक्रेनमधील इतर प्रदेशांवर रशियाचे नियत्रंण स्वीकारेल.

मात्र या प्रस्तावाला युक्रेन आणि त्यांच्या युरोपातील मित्र देशांनी विरोध दर्शवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, प्रादेशिक प्रश्न हे संपूर्ण युद्धबंदी झाल्यावरच विचारात घेतले जावेत आणि सध्या अस्तित्वात असलेली लाईन ऑफ कंट्रोलवर आधारित असावेत.