Donald Trump message to India on high tariffs : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर लादण्याच्या त्यांच्या इशाऱ्याचा पुनरुच्चार केला आहे. ट्रम्प यांनी भारतावर जास्त कर आकारत असल्याचा दावाही केला आहे. याबरोबरच अमेरिकेकडून भारत आकरतो तेवढेच कर भारतावरही लादण्यात येतील असेही ट्रम्प म्हणाले आहेत.

सोमवारी माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी भारताकडून काही अमेरिकन उत्पादनांवर लावण्यात येणाऱ्या १०० टक्के शुल्कावर टीका केली आहे. ट्रम्प म्हणाले की, रेसिप्रोकल कर महत्त्वाचा आहे. कारण जर आमच्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला जात असेल तर आम्ही देखील ते केले पाहिजे. भारत, चीन, ब्राझील सारखे अनेक देश खूप जास्त शुक्ल आकारत आहेत. जर त्यांना अमेरिकेवर शुल्क लादायचे असेल तर ठीक आहे, पण आम्ही देखील त्यांच्याकडून तेच शुल्क घेऊ. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतासह कॅनडाला देखील इशारा दिला होता की जर त्यांनी अमेरिकेत येणारे ड्रग्स आणि अवैध स्थलांतरितांना रोखले नाही तर त्यांच्यावर ४५ टक्के शुल्क लादले जाईल

ट्रम्प म्हणाले की, “रेसिप्रोकल हा शब्द महत्वाचा आहे, कारण जर भारत आमच्याकडून १०० टक्के शुल्क आकारत असेल, तर आपण त्यांच्याकडून काहीच शुल्क घेणार नाहीत का? तुम्हाला ठाऊक आहे, ते आपल्याकडे सायकल पाठवतात आणि आपण त्यांना सायकल पाठवतो. ते आपल्याकडून १०० आणि २०० आकरतात”. पीटीआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

चीनबरोबरच्या संभाव्य व्यापार करारावरील प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, भारत आणि ब्राझील हे जास्त शुल्क आकारतात. “भारत खूप शुल्क घेतो. ब्राझील खूप शुल्क घेते. जर त्यांना आमच्याकडून शुल्क आकारायचे असेल तर ते ठीक आहे, परंतु आम्ही त्यांच्याकडून तेच आकारणार आहोत”.

ट्रम्प यांनी दावा केला की जवळजवळ सर्व प्रकरणांमध्ये, अमेरिकन उत्पादनांवर कर आकारला जात आहे परंतु अमेरिकन प्रशासन त्यांच्यावर कर लावत नाही. “रेसिप्रोकल. जर त्यांनी आमच्यावर कर लावला तर आम्ही त्यांच्यावर तेवढाच कर लावू. ते आमच्यावर कर लावतात. आम्ही त्यांच्यावर कर लावतो. आणि ते आमच्यावर कर लावतात,” असेही ट्रम्प यावेळी बोलताना म्हणाले.

या सर्व प्रकरणावर ट्रम्प यांचे कॉमर्स सेक्रेटरी हॉवर्ड लुटनिक म्हणाले की, आगामी काळात ट्रम्प प्रशासनात ‘रेसिप्रोसिटी’ हा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे. पुढे एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “तुम्ही आमच्याशी कसे वागता अगदी तशीच वागणूक तुम्हाला देखील अपेक्षित असली पाहिजे”.

हेही वाचा>> हजारो कोटींचा घोटाळा करून पळालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीकडून किती रुपये वसूल केले? संसदेत दिली माहिती

भारताची अमेरिकेतील निर्यात वाढली..

आकडेवारीनुसार, अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, दोन देशांमधील व्यापार आर्थिक वर्षात १२० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. जो भारत-चीन व्यापाराच्या आकडेवारीपेक्षा किंचित जास्त आहे. तसेच चीनच्या तुलनेत भारताचे अमेरिकेबरोबरचे व्यापारी संतुलन अधिक अनुकूल राहले आहे.

भारताकडून अमेरिकेला होणार्‍या निर्यातीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भारताची अमेरिकन बाजारातील निर्यात २०२०-११ मध्ये १० टक्के होती, जी आता वाढून १८ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. भारताकडून निर्यात होणार्‍या मालात टेक्सटाईल, इलेक्ट्ऱॉनिक्स आणि इंजिनियरिंग साहित्याचा वाटा सर्वाधिक आहे..

Story img Loader