Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या निकिता कॅसप या तरुणाला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील विस्कॉन्सिन या ठिकाणचा हा १७ वर्षीय युवक आहे. त्याने त्याच्या आई वडिलांची हत्या केली असाही आरोप त्याच्यावर आहे.

निकिता कॅसपवर काय आरोप आहे?

निकिता कॅसप या १७ वर्षीय तरुणावर आरोप आहे की त्याने ११ फेब्रुवारीच्या दिवशी त्याच्या घरात त्याची ३५ वर्षीय आई तातियाना आणि ५१ वर्षीय सावत्र वडील डोनाल्ड या दोघांची हत्या केली. अमेरिकेतील न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार निकिता कॅसप या १७ वर्षीय तरुणाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला. तर काही अधिकाऱ्यांनी हे म्हटलं आहे की निकिता कॅसपला आर्थिक स्वायतत्ता आणि स्वैर वागता यावं यासाठी त्याने त्याच्या आई वडिलांना ठार केलं.

निकिता कॅसपच्या विरोधात ९ गंभीर आरोप

निकिता कॅसपच्या विरोधात ९ गंभीर आरोप आहेत. आई वडिलांची हत्या करणं, दोन्ही मृतदेह लपवणे, दोन्ही मृतदेहांची ओळख पटणार नाही अशी अवस्था करणं, १० हजार डॉलरहून अधिक संपत्तीची चोरी करणं, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणं, घातक शस्त्रांचा वापर अशा ९ गुन्ह्यांप्रकरणी त्याच्यावर आरोप आहेत. निकिता कॅसपला याआधी पोलिसांनी वडिलांची एसयूव्ही चोरल्या प्रकरणीही अटक केली होती. एवढंच नाही तर निकिता कॅसपला हत्यार बाळगल्याप्रकरणीही अटक करण्यात आली होती. न्यायालतील प्रतिज्ञापत्रानुसार निकिता कॅसपकडे अशी कागदपत्रं आणि टेक्स्ट मेसेज मिळाले ज्यानुसार तो डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचा कट आखत होता तसंच अमेरिकेचं सरकार पाडण्याचा त्याचा विचार होता असंही समजतं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. स्थानिक वृत्तांनुसार निकिता कॅसप हा नाझी विचारांनी प्रभावित झालेला आरोपी होता. त्याच्या फोनमध्ये नाझी विचारांच्या द ऑर्डर ऑफ नाइन अँगल्स शी संबंधित काही गोष्टी सापडल्या आहेत. या सगळ्यावरुन तो डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याच्या विचारात होता हे समोर आलं आहे. आता त्याची या प्रकरणी चौकशी सुरु आहे.

निकिता कॅसप याला कोर्टात करण्यात आलं होतं हजर

निकिता कॅसपकडे काही लिखित कागदही मिळाले आहेत. ज्यावर त्याने डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या कशी करायची यासंदर्भातल्या काही बाबी नमूद करुन ठेवल्या होत्या. HAIL HITLER, HAIL THE WHITE RACE, HALE VICTORY असा उल्लेख असलेले तीन कागदही त्याच्याकडे सापडले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. निकिता कॅसपला ९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे.