Donald Trump nominated Kash Patel as new FBI Director : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी काश पटेल यांच्याकडे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)चे नेतृत्व सोपवण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान काश पटेल अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ राहिले आहेत. तुलसी गब्बार्ड यांच्याकडे नॅशनल इंटेलिजन्सची जबाबदारी दिल्यानंतर आता पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी प्रशासनात संधी मिळालेले दुसरे भारतीय-अमेरिकन ठरले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
डोनाल्ड ड्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, “कश्यप ‘काश’ पटेल हे फेडरल ब्युरो ऑफ इंव्हेस्टीगेशनचे पुढील संचालक म्हणून काम करतील हे जाहीर करताना मला अभिमान वाटतो आहे. काश एक हुशार वकिल, इन्व्हेस्टीगेटर आणि ‘अमेरिका फर्स्ट’ फायटर आहेत ,ज्यांनी आपली कारकीर्द भ्रष्टाचार उघड करणे, न्यायाचे रक्षण आणि अमेरिकन नागरिकांचे संरक्षण करण्यात घालवली आहे.
वॉशिंग्टनच्या राजकीय वर्तुळात काश पटेल यांचे नाव सेंट्रल इंटेलिजन्स ब्युरो (CIA) चे प्रमुख म्हणून चर्चेत होते, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी या पदावर त्यांचे जवळचे सहकारी जॉन रॅटक्लिफ (John Ratcliffe) यांची नियुक्ती केली. पटेल यांच्या नावाची घोषणा करत असतानाच ट्रम्प यांनी फ्लोरिडाच्या हिल्सबरो (Hillsborough) काउंटीचे शेरीफ चॅड क्रोनिस्टर यांची ड्रग एन्फोर्समेंट एजन्सीचे प्रमुख म्हणून नेमणूक केल्याची घोषणा देखील केली.
हेही वाचा>> “आमच्यावर होणारा प्रत्येक हल्ला…”, अमेरिकेच्या आरोपानंतर गौतम अदाणींची पहिली प्रतिक्र…
पटेल यांनी केलेल्या कामांची माहिती देताना ट्रम्प म्हणाले की, “काश यांनी माझ्या पहिल्या कार्यकाळात दमदार काम केले, येथे त्यांनी संरक्षण विभागामध्ये चीफ ऑफ स्टाफ, डेप्युटी डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत दहशतवाद विरोधी विभागाचे वरिष्ठ संचालक म्हणून काम केले. काश यांनी ६० हून अधिक ज्युरी ट्रायल्स देखील घेतल्या आहेत”.
काश पटेल के ख्रीस्तोफर व्रे (Christopher Wray) यांची जागा घेणार आहेत. २०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनीच व्रे यांची एफबीआयचे संचालक म्हणून १० वर्षांसाठी नियुक्ती केली होती. पटेल हे अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील असेही ट्रम्प यांनी जाहीर केले. पटेल यांच्या नावाची घोषणा ट्रम्प यांनी केली असली तरी त्याची निश्चिती ही रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखालील सिनेटने मंजूरी दिल्यानंतरच होणार आहे.