Donald Trump address to US Congress : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (५ मार्च) संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केलं. अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर नव्या कार्यकाळात ट्रम्प यांनी पहिल्यांदाच संसदेला संबोधित केलं. अपेक्षेप्रमाणे अमेरिकन नागरिकांसाठी महत्त्वाचे व अमेरिकेच्या फायद्याचे अनेक निर्णय ट्रम्प यांनी आजच्या भाषणातून जाहीर केले. तसेच त्यांनी मेक्सिको, चीन, युक्रेन व भारत या देशांना धक्के दिले. ट्रम्प यांनी तब्बल १ तास ३० मिनिटांचं भाषण केलं. या भाषणादरम्यान त्यांनी दोन वेळा भारताचा उल्लेख केला. त्यांनी आयात शुल्काच्या मुद्द्यावरून भारतावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “भारत आपल्यावर १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादतो. हा काही योग्य निर्णय नाही. आम्ही देखील आगामी २ एप्रिलपासून त्यांच्यावर आयात शुल्क लादू. इथून पुढे जो देश आमच्यावर आयात शुल्क लादेल आमेरिका त्यांच्यावर तितकं आयात शुल्क (Reciprocal Tariff) लादेल. २ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “इतर देशांनी गेल्या अनेक दशकांपासून आपल्याविरोधात आयात शुल्काचा वापर केला आहे. आता आमची वेळ आहे. आता आम्ही त्या देशांविरोधात आयात शुल्काचा वापर करणार आहोत. तुम्ही अमेरिकेत तुमचं उत्पादन घेत नसाल तर तुम्हाला आयात शुल्क द्यावंच लागेल. काही बाबतीत तर तुम्हाला भरमसाठ शुल्क भरावं लागेल.”

डोनाल्ड ट्रम्प भारताबद्दल काय म्हणाले?

अमेरिकेच्या अध्यक्षांनी पहिल्यांदाच अमेरिकेवर आयात शुल्क लादणाऱ्या देशांची यादी वाचून दाखवली आणि त्यांच्यावरील नाराजी उघड केली. ट्रम्प म्हणाले, “युरोपियन संघ, चीन, ब्राझील, भारत, मेक्सिको आणि कॅनडाने आपल्यावर आयात शुल्क लादलं आहे. हे देश आपल्या वस्तूंवर आयात शुल्क आकारतात. या प्रमुख देशांबरोबरच इतरही अनेक देश आमच्याकडून भरमसाठ आयात शुल्क आकारतात. ते आपल्याकडून जितकं शुल्क वसूल करतील, तितकंच शुल्क आता आपण त्यांच्याकडून वसूल करायचं आहे. भारतासारख्या देशांनी अमेरिकेकडून आयात शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे.”

कॅनडा व मेक्सिकोपासून सुरुवात

डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच आदेश जारी करून कॅनडा व मेक्सिकोतून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर २५ टक्के शुल्क किंवा टॅरिफ लागू केलं आहे. ४ फेब्रुवारीपासून टॅरिफची अंमलबजावणी सुरू केली आहे. ट्रम्प यांनी चीनवरही १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क जारी केलं आहे. या तीन देशांनंतर ट्रम्प यांच्या टॅरिफ अस्त्राचे पुढील लक्ष्य चीन वगळता इतर ‘ब्रिक्स’ देश असतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आता ब्रिक्समधील भारत व ब्राझील या दोन देशांवर ट्रम्प यांनी टॅरिफ अस्त्राचा वापर केला आहे.