Donald Trump On Jammu and Kashmir Pahalgam terror attack : जम्मू-काश्मीर येथील प्रसिध्द पर्यटन स्थळ पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. जखमी झालेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्रातील काही जणांचा देखील समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला असून यामध्ये सहभाग असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही असे म्हटले आहे. दरम्यान या घटनेनंतर आता जगभरातून प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे.
जगभरातून दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला जात आहे. याजरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या हल्लाचा निषेध केला आहे. त्यांनी पोस्ट करत दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये अमेरिका भारताबरोबर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, “काश्मीरमधून अत्यंत अस्वस्थ करणारी बातमी आली आहे. दहशतवादाविरोधात अमेरिका भारताबरोबर खंबीरपणे उभी आहे. आम्ही मृतांच्या आत्म्यासाठी आणि जखमींच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. पंतप्रधान मोदी आणि भारतातील लोकांना आमचा पूर्ण पाठिंबा आणि सहानुभूती आहे. आमची तुम्हा सर्वांबरोब आहेत!”
यामध्ये सहभागी असणाऱ्यांना सोडणार नाही – पीएम मोदी
काश्मीरमधील या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दहशतवाद्यांना कठोर इशारा दिली आहे. “जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागे सहभागी आहेत त्यांना सोडणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी बळकट होईल” असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
मृतांमध्ये दोन महाराष्ट्रातील
जम्मू-काश्मीर येथील हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दिलीप डिसले, अतुल मोने अशी मृतांची नावे आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.