न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आलिशान नोकरीतील वेतनेतर लाभांवरील वैयक्तिक प्राप्तीकर योजनाबद्धरित्या चुकवल्याबद्दल शिक्षा म्हणून ट्रम्प यांच्या कंपनीला शुक्रवारी १६ लाख डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. यामुळे अब्जावधी डॉलरची मालमत्ता असण्याचा दावा करणाऱ्या या उद्योगाला मोठा धक्का बसला आहे.
कारस्थान रचणे आणि खोटे व्यावसायिक दस्तावेज तयार करणे यांसह १७ करविषयक गुन्ह्यांसाठी गेल्या महिन्यात ट्रम्प यांच्या कंपनीला दोषी ठरवण्यात आले होते. न्यायाधीश जुआन मॅन्युअल यांनी ठोठावलेला दंड हा कायद्याद्वारे ठोठावला जाऊ शकणारा कमाल दंड होता. ट्रम्प यांच्या मालकीच्या इमारतींमध्ये भाडेमुक्त अपार्टमेंट, आलिशान मोटारी आणि खासगी शाळांतील शिकवण्या यांसह मिळालेल्या लाभांवरील कर काही अधिकाऱ्यांनी चुकवला होता. दंडाची रक्कम चुकवलेल्या कराच्या रकमेच्या दुप्पट आहे.