एकीकडे भारतात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झालेली असताना दुसरीकडे अमेरिकेतही राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा या निवडणुकीत आपलं नशीब आजमावण्यासाठी उतरले आहेत. यावेळी आपणच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ असा आत्मविश्वास त्यांना वाटतोय. एवढंच नाही, तर त्यांनी चक्क भारतीय वंशाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं कौतुकही करुन टाकलं आहे. आर्थिक गैरव्यवहारात चौकशी चालू असणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत उतरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. अमेरिकेतील पद्धतीनुसार ठिकठिकाणी होणाऱ्या नियोजित चर्चासत्रांमधून राष्ट्राध्यक्षपदाचे सर्व उमेदवार सहभागी होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे निक्की हॅली या महिला उमेदवाराने डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली असताना आता त्यांच्यापाठोपाठ विवेक रामास्वामी या भारतीय वंशाच्या दुसऱ्या उमेदवाराने निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांना उपराष्ट्राध्यक्ष होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत!
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या पहिल्या रिपब्लिकन डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प सहभागी झाले नव्हते. त्यांच्याव्यतिरिक्त इतर ८ उमेदवार या चर्चेत सहभागी झाले होते. “संभाव्य उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार निवडीसाठी आपण या चर्चेचं रेकॉर्डिंग नक्की पाहू”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
दरम्यान, यावेळी विवेक रामास्वामी यांच्याविषयी विचारणा केली असता ट्रम्प यांनी ते एक चांगले उपराष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, अशी टिप्पणी केली आहे. “विवेक रामास्वामी हे एक फार ज्ञानी आणि हुशार व्यक्ती आहेत. त्यांच्यामध्ये उत्साह आणि ऊर्जा आहे. हे नक्की उपराष्ट्राध्यक्ष म्हणून चांगलं काम करू शकतील”, असं ट्रम्प म्हणाले.
कोण आहेत विवेक रामास्वामी?
विवेक रामास्वामी यांच वडील वी. जी. रामास्वामी हे केरळचे होते. नंतर ते अमेरिकेत कामानिमित्त स्थायिक झाले. विवेक रामास्वामी यांचा जन्म सिनसिनाटीमध्ये झाला. सध्या बायोटेक व्यवसायात विवेक रामास्वामी यांचं नाव मोठं आहे. रोइवेंट ही औषध निर्मिती करणारी प्रसिद्ध कंपनी ते चालवतात.