पेनसिल्व्हेनिया : अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प जीवघेण्या हल्ल्यातून बालंबाल बचावले. येथील सभेदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला. एक गोळी कानाला चाटून गेली असून ते जखमी झाले असले तरी त्यांच्या जिवाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर अमेरिकेसह जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणुकीत ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असतील.
हेही वाचा >>> छुप्या दहशतवादाचे हत्यार! जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षता बाळगण्याचे आदेश
काय घडले?
● बटलर टाऊनमध्ये मोकळ्या मैदानावरील सभेवेळी ट्रम्प यांच्यावर गोळीबार.
● हल्लेखोर थॉमस मॅथ्यू क्रूक्स (२०) घटनास्थळीच सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात ठार.
● ट्रम्प यांच्या कानाला दुखापत, जिवाला धोका नाही.
● अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची ट्रम्प यांच्याशी चर्चा.
● हल्लेखोर रिपब्लिकन पक्षाचा नोंदणीकृत मतदार होता.
● त्याच्या वाहनामध्ये तसेच घरामध्ये तपास यंत्रणांना बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आढळून आले आहे.
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांकडून हल्ल्याचा निषेध.
आपल्या देशात अशी घटना घडणे धक्कादायक आहे. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी चाटून गेली आणि त्याच वेळी मला समजले की काहीतरी गडबड आहे. माझ्या कानात आवाज घुमला आणि नंतर गोळीबाराचे आवाज ऐकू आले. भरपूर रक्तस्राव झाला. देव अमेरिकेचे भले करो... – डोनाल्ड ट्रम्प, माजी अध्यक्ष, अमेरिका