Donald Trump Hit On The Face With Microphone : डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून ते वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे पडसाद जगभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर एक विचित्र घटना घडली. शुक्रवारी जॉइंट बेस अँड्र्यूज येथे पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांच्याबरोबर घडलेल्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

विमानता बसण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प हे पत्रकारांशी संवाद साधत होते तेव्हा अचानक एका रिपोर्टरचा माइक थेट ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर लागला. ट्रम्प यांनी लगेचच त्यांचा चेहरा मागे घेतला आणि डोळे बंद केले. दमम्यान या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून यावरून वेगवेगळ्या चर्चांना सुरूवात झाले आहे.

अचानक झालेल्या या घटनेनंतर माइक लगेचच मागे घेण्यात आला मात्र ट्रम्प यांनी भुवया उंचावल्या आणि रिपोर्टरकडे एकटक रोखून पाहिले. मात्र यानंतर ट्रम्प यांनी ही स्थिती योग्य पद्धतीने हाताळली आणि चेहऱ्यावर हस्य आणून समोरच्या एका व्यक्तीला तुम्ही हे पाहिले का? असंही विचारलं. तसेच “आज रात्री ही एक मोठी बातमी बनेल” असेही ट्रम्प म्हणताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. दरम्यान बूम माइक ऑपरेटर कोणत्या माध्यम संस्थेसाठी काम करत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान या घटनेनंतरही ट्रम्प यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देणे सुरूच ठेवले. विमानात बसण्यापूर्वी त्यांनी गाझा येथील स्थिती, युक्रेन रशिया युद्ध आणि टॅरिफ यासारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर माइक लागल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यानंतर ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल देखील चिंता व्यक्त केली जात आहे.

ट्रम्प यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

व्हिडिओ शेअर करणाऱ्या पत्रकाराने ट्रम्प यांच्या सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी या व्हिडीओबरोबर दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “एका पत्रकाराने तो बूम माइक ट्रम्प यांच्या चेहऱ्याच्या इतक्या जवळ कसा काय आणला? हे काही योग्य वाटत नाही. सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करायला हवी. माध्यमांसाठी हे लाजिरवाणे आहे.”

Story img Loader