अध्यक्षीय चर्चेत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य
चीनने अमेरिकेला व्यापारात मागे टाकले आहे, पण चीनने चलन अवमूल्यनासारख्या खेळय़ा करणे थांबवले नाहीतर मी अध्यक्ष झाल्यानंतर चिनी वस्तूंवर कर लावीन, असे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. कुठल्याही देशातील मुस्लिमांना अमेरिकेत येऊ देणार नाही हे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी कायम ठेवले आहे. त्यावर जेब बुश यांनी सांगितले, की अमेरिकेचे मित्र देश असलेल्या भारत, इंडोनेशिया यांसारख्या देशांतील मुस्लिमांनाही रोखणे ट्रम्प यांना कितपत योग्य वाटते.
या वर्षांतील पहिल्याच अध्यक्षीय चर्चेत ट्रम्प यांनी सांगितले, की कर लावण्यास मी अनुकूल आहे. अमेरिकेला न्याय्य वागणूक मिळणार नसेल तर चीनच्या सगळय़ा वस्तूंवर कर लावू. चीनच्या वस्तूंवर कर लावल्याशिवाय ते सरळ होणार नाहीत, ते अमेरिकी वस्तूंवर कर लादतात. जे ते आमच्याबाबतीत करतात तेच आम्ही त्यांच्या बाबतीत करू. चीन चलनाचे अवमूल्यन करीत आहे व आमच्या कंपन्यांना धोक्यात आणत आहे, चीनमुळे अमेरिकेतील ४० ते ७० लाख रोजगार गेले. चीन-अमेरिका यांच्यातील व्यापार न्याय्य नाही, चीनच्या बरोबर व्यापारात या वेळी ५०५ अब्ज डॉलर्सची तूट आहे, कारण ते चलनाचे अवमूल्यन करतात.