Donald Trump on Prince Harry deport: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर त्यांनी देशातील अवैध स्थलांतरितांना बाहेर हुसकाविण्याचा चंग बांधला आहे. काही देशांमधील स्थलांतरितांना बेड्या ठोकून त्यांच्या त्यांच्या देशात विमानाने पाठवून देण्यात आलेले आहे. यानंतर आता ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स हॅरी यांच्या इमिग्रेशन वादाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मात्र प्रिन्स हॅरी यांना अमेरिकेच्या बाहेर जाण्यास सांगणार नसल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत. न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट प्रिन्स हॅरी यांच्या पत्नी मेगन मार्कल यांचा उल्लेख केला. “प्रिन्स हॅरी हे आधीच पत्नीकडून त्रासलेले आहेत, त्यामुळे त्यांना बाहेर काढण्याचा आमचा कोणताही विचार नाही”, असे विधान ट्रम्प यांनी केले.
“मी प्रिन्स हॅरी यांना बाहेर काढू इच्छित नाही. मी त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून देतोय. ते आधीच पत्नीकडून त्रासलेले आहेत. त्यांची पत्नी वेगळेच प्रकरण आहे”, असे विधान ट्रम्प यांनी न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत केले. प्रिन्स हॅरी हे जानेवारी २०२० मध्ये राजघराण्यातून बाहेर पडले आणि त्यांनी मेगन मार्केल यांच्या घरी म्हणजे कॅलिफोर्नियात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. कॅलिफोर्नियात आल्यानंतर त्यांनी एक एनजीओ स्थापन केली आहे. या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवित असतात.
अमेरिकेतील हेरिटेज फाऊंडेशन या पुराणमतवादी संस्थेने प्रिन्स हॅरी यांच्या व्हिसाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. प्रिन्स हॅरी यांनी भूतकाळात अमली पदार्थांचा वापर केला होता. मात्र ही बाब सुरक्षा यंत्रणांकडून लपवून ठेवली. प्रिन्स हॅरी यांनी काही काळापूर्वी ‘स्पेअर’ हे आत्मचरित्र लिहिले होते. ज्यात त्यांनी पूर्वी अमली पदार्थांचे सेवन केले असल्याचे म्हटले आहे. प्रिन्स हॅरी यांच्या इमिग्रेशनचा वाद सध्या वॉशिग्टंनमधील न्यायालयात सुरू आहे.
ट्रम्प आणि प्रिन्स हॅरी – पत्नी मेगनचे तणावपूर्ण संबंध
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या विधानाला गतकाळातील वादाची पार्श्वभूमी आहे. जो बायडेन राष्ट्राध्यक्ष असताना ब्रिटनच्या राजघराण्याला विशेष वागणूक दिली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच ट्रम्प यांनी हॅरी यांची अनेकदा खिल्लीही उडविली होती. मेगन मार्केल यांनी प्रिन्स हॅरीला चाबकाने मारले होते, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. ब्रिटिश राजघराण्यातूनही ट्रम्प यांना लक्ष्य करण्यात येते. २०१६ च्या निवडणुकीत मेगन मार्केल यांनी ट्रम्प यांना विभाजनवादी आणि स्त्रीद्वेषी म्हटले होते.