Donald Trump Announces Extra Tariffs On Canada And Mexico : अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी शपथ घेतली. सोमवारी भारतीय वेळेप्रमाणे रात्री १०.३० च्या सुमारास हा सोहळा पार पडला. मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांतच, जल्लोष करणाऱ्या गर्दीसमोर ऐतिहासिक अशा अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱ्या केली.
कॅनडा, मेक्सिकोला दणका
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी संध्याकाळी घोषणा केली की, अमेरिका १ फेब्रुवारीपासून मेक्सिको आणि कॅनडामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त कर लादणार आहे. ओव्हल ऑफिसमध्ये झालेला हा निर्णय उत्तर अमेरिकन व्यापार धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल असून, यामुळे अमेरिकन ग्राहकांना महागाईचा फटका बसू शकतो. असे वृत्त सीएनएनने दिले आहे.
चीनवरील आयात शुल्कांबाबात विचारले असता, ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनवर लादलेल्या शुल्कांवर प्रकाश टाकला. तसेच त्यांच्यानंतर उत्तराधिकारी जो बायडेन यांनीही ते शुल्क कायम ठेवल्याचेही नमूद केले.
निवडणुकीतील आश्वासणांवर भर
अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान उमेदवार म्हणून, ट्रम्प यांनी आक्रमक व्यापार धोरणांचा उल्लेख केला होता. ज्यामध्ये सर्व देशांमधून होणाऱ्या आयातीवर २० टक्क्यांपर्यंतचा कर लागू करणे याचा समावेश होता. त्यांच्या प्रस्तावांमध्ये मेक्सिको आणि कॅनडामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर आणि चीनमधून आताय होणाऱ्या वस्तूंवर ६० कर लादण्याच्या समावेश होता.
जो बायडेन यांचे निर्णय बदलणार
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याच्या अगदी काही तास आधी तिसर्या जागतिक महायुद्धाबद्दल मोठे भाष्य केले होते. तसेच त्यांनी अमेरिकेच्या सीमेवर होत असलेले हल्ले देखील रोखण्याचे आश्वासन पूर्ण करणार असल्याचे म्हटले होते. शपथविधीपूर्वी त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ट्रम्प आपल्या प्रचारात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्याच्या काही तास आधी ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या सभेत त्यांच्या समर्थकांना संबोधित केले होते. यावेळी त्यांनी जो बायडेन यांचे काही कार्यकारी निर्णय देखील माघारी घेणार असल्याचे जाहीर केले होते.