Donald Trump on WHO : अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पर्व सुरू झालं आहे. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं दिली. दरम्यान, “अमेरिकेला भेडसावत असलेली प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी ऐतिहासिक अशा वेगाने काम करेन”, अशी ग्वाही ट्रम्प यांनी शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दिली. ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता शपथ घेतली. अनेक दशकांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या संसदेत अध्यक्षांचा शपथविधी पार पडला. कारण अमेरिकेत सध्या कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे अमेरिकेन संसदेत या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
दरम्यान, अध्यक्षपदाची शपथ घेताच ट्रम्प यांनी घेतलेला पहिला निर्णय पाहून जगाला आश्चर्य वाटू लागलं आहे. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेचा भाग नसेल. यासंबंधीच्या आदेशांवर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेण्याचे आदेश देणाऱ्या दस्तावेजांवर स्वाक्षरी करताना ट्रम्प म्हणाले, “अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक निधी देणारा देश होता”. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागकित आरोग्य संघटनेला मिळणारा निधी कमी होणार आहे. २०२४-२५ च्या अमेरिकेच्या अर्थसंकल्पात जागतिक आरोग्य संघटनेसाठी ६६२ मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या निधीची तरतूद करण्यात आली होती.
देशाला भेडसावणारी प्रत्येक समस्या सोडवेन : ट्रम्प
दरम्यान, वॉशिंग्टन येथील ‘कॅपिटॉल वन अरीना’ येथे ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित केले. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजय साजरा करण्यासाठी मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. ‘मेक अमेरिका ग्रेट’ विजय सोहळ्यासाठी २० हजार क्षमतेचे ‘कॅपिटॉल वन’ पूर्णपणे भरले होते. कडाक्याच्या थंडीमध्येही अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी ट्रम्प म्हणाले, “उद्यापासून सुरू होणाऱ्या माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये अतिशय वेगाने पूर्ण शक्तीने काम करेन. देशाला भेडसावत असलेली प्रत्येक समस्या मार्गी लावेन. आपल्याला हे करावेच लागेल. अध्यक्षपदावर येण्यापूर्वीच कुणालाही अपेक्षित नसलेल्या समस्यांचे निकाल लागताना तुम्हाला दिसत असेल. प्रत्येक जण याला ‘ट्रम्प इफेक्ट’ म्हणत आहे.”
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आपण निवडणूक जिंकल्यापासून शेअर बाजारात तेजी आहे. आपल्या विजयामुळे छोट्या व्यावसायिकांचा आशावादही खूप वाढला आहे. बिटकॉइनही विक्रम करीत आहे. ‘डीएमएसीसी’ २० ते ४० अब्ज तर ‘सॉफ्टबँक’ने १०० ते २०० अब्ज डॉलर गुंतवणुकीचे वचन दिले आहे. आपण निवडणुका जिंकल्यामुळे गुंतवणूक येत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.’