Canada-US Trade War: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शेजारील देश कॅनडाबरोबर त्यांचे संबंध ताणले असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशात आता अमेरिकेच्या तीन राज्यांवर कॅनडाच्या ओंटारियो प्रांताने वीज अधिभार लादल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी कॅनडाला “टॅरिफ गैरवापर करणारा देश” म्हटले आहे. यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी असाही दावा केला की, त्यांच्या देशाला कॅनडाकडून होणाऱ्या वीज पुरवठ्याची गरज नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप
ट्रूथ सोशल या प्लॅटफॉर्मवर या प्रकरणावर भाष्य करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “कॅनडा आपल्या अनेक शेती उत्पादनांवर अमेरिकेकडून २५०% ते ३९०% पर्यंत शुल्क आकारत आहे. आता ओंटारियोने नुकतेच विजेच्या सर्व वस्तूंवर २५% अधिभार लावण्याची घोषणा केली आहे. पण, त्यांना असे करण्याची कोणताही अधिकार नाही.”
या पोस्टमध्ये ट्रम्प पुढे म्हणाले की, “आमच्या परस्पर शुल्कातून आम्ही २ एप्रिल पासून कॅनडाकडून ते सर्व परत मिळवू. कॅनडा हा टॅरिफचा गैरवापर करणारा देश असून, त्यांनी नेहमीच असे केले आहे. परंतु युनायटेड स्टेट्स आता कॅनडाला कोणतेही अनुदान देणार नाही. आम्हाला तुमच्या गाड्यांची, तुमच्या लाकडाची आणि तुमच्या उर्जेची गरज नाही.”
कॅनडाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रांत ओंटारियोने मिनेसोटा, न्यू यॉर्क आणि मिशिगनमध्ये राहणाऱ्या सुमारे १.५ दशलक्ष अमेरिकन ग्राहकांसाठी वीज निर्यात शुल्कात २५% वाढ जाहीर केल्यानंतर ट्रम्प यांचे हे वक्तव्य आले आहे.
मागेपुढे पाहणार नाही…
“मी हे शुल्क आणखी वाढवण्यास मागेपुढे पाहणार नाही. जर अमेरिकेने आणखी तणाव वाढवला, तर मी वीज पूर्णपणे बंद करण्यासही मागेपुढे पाहणार नाही,” असे ओंटारियोचे प्रीमियर (सरकारचे) डग फोर्ड म्हणाले होते.
“मी हे करू इच्छित नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. ज्या अमेरिकन लोकांनी हा ट्रेड वॉर सुरू केला नाही त्यांच्याबद्दल मला वाईट वाटते. याला जबाबदार असलेली एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,” असे डग फोर्ड यांनी म्हटले.