गर्भपात करवून घेणाऱ्या महिलांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, असे मत अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. एमएसएनबीसीच्या ख्रिस मॅथ्यूज यांना प्रत्युत्तर देताना ट्रम्प यांनी हे विधान केले. मात्र, ट्रम्प यांनी गर्भपात करवून घेणाऱ्या महिलांना नेमकी कोणती शिक्षा व्हावी, हे स्पष्ट केले नाही. विसकॉनसीन राज्यामध्ये ही चर्चा झाली. गर्भपातावर पूर्ण बंदी घालावी का ? या विषयावर बोलताना त्यांनी गर्भपात करणा-या महिलांना शिक्षा झाली पाहिजे असे वादग्रस्त विधान केले.
यावेळी ट्रम्प यांनी म्हटले की, गर्भपात करवून घेणाऱ्या महिलांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे. यावर मॅथ्यूज यांनी कोणती शिक्षा करावी असे विचारले असता ट्रम्प यांनी शिक्षेचे निश्चित स्वरूप सांगण्यास असमर्थता दर्शविली. याशिवाय, महिलांनी बेकायदेशीर ठिकाणी गर्भपात करून घेतल्यास चालेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
ट्रम्प यांच्या या विधानावर डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या हिलरी क्लिंटन यांनी जोरदार टीका केली आहे. या विधानातून ट्रम्प यांचे घृणास्पद आणि खालच्या पातळीचे विचार दिसतात. ते दुस-या रिपब्लिकन्सपेक्षा वेगळे नाहीत अशी टिका हिलरी यांनी केली आहे.