दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक तसेच अतिउजव्या आघाडीचे नेते हावीर मिली यांनी बाजी मारली आहे. रविवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. मध्यम-डाव्या विचारसरणीचे विद्यमान अर्थमंत्री सर्जिओ मास्सा आणि मिली यांच्यात लढत होती. मात्र मास्सा या लढतीत पराभूत झाले.
मिली यांना मिळाली ५६ टक्के मते
अर्जेंटिना येथील अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या निवडणुकीत मिली यांना साधारण ५६ टक्के मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेले पेरोनिस्ट पक्षाचे नेते सर्जिओ मास्सा यांना साधारण ४४ टक्के मते मिळाली. निकाल स्पष्ट झाल्यानंतर मिस्सी यांनी आपला पराभव स्वीकारला. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जेंटिनामध्ये महागाई, बेरोजगारी यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता होती. याच कारणामुळे येथे आता सत्तांतर झाले आहे.
हावीर मिली कोण आहेत?
हावीर मिली हे उजव्या विचारसरणीचे समर्थक आहेत. ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक मानले जातात. सत्तेत आल्यास सध्याचे चलन पेसो बंद करून डॉलर आणू, देशाच्या मध्यवर्ती बँकेला टाळे ठोकू अशी आर्थिक आश्वासने त्यांनी दिली आहेत. याखेरीज वातावरण बदल हे थोतांड आहे, लैंगिक शिक्षण कुटुंबव्यवस्थेचा ऱ्हास करण्यासाठी रचलेला कट आहे, मानवी अवयवांची खरेदी-विक्री कायदेशीर असावी अशी जहाल मते ते मांडत असतात.
दरम्यान, या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हावीर मिली यांचे अभिनंदन केले. भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील संबंध वृद्धिंगत व्हावे यासाठी तुमच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे मोदी म्हणाले. अर्जेंटिनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उजव्या आणि डाव्या विचारांच्या आघाड्यांची आलटून-पालटून सत्ता राहिली आहे. आता मात्र उजव्या विचारसरणीचे हावीर मिली हे अर्जेंटिनाच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाले आहेत.