Donald Trump Presidential Inauguration Latest Updates : अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पर्व सुरु झालं आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं दिली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकन संसदेत पार पडला शपथविधी सोहळा

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता शपथ घेतली. अनेक दशकांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची शपथ ही अमेरिकेच्या संसदेत पार पडली. कारण अमेरिकेत कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे अमेरिकेन संसदेत या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

मेलेनिया ट्रम्प यांनी परिधान केला होता खास ड्रेस

पती डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या मेलेनिया ट्रम्प यांनी न्यूयॉर्कहून डिझाईन करण्यात आलेला खास ड्रेस परिधान केला होता. मेलेनिया यांचा हा खास ड्रेस रॉल्फ लॉरेन यांनी डिझाईन केला होता. तसंच या खास ड्रेसवर मेलेनिया यांनी बोलेरो जॅकेट घातलं होतं. तसंच खास प्रकारचे हातमोजेही घातले होते.

रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं होतं?

रविवारी म्हणजेच शपथविधी सोहळ्याच्या आधी एक खास डिनर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी आलेल्या सगळ्यांना संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी पदभार स्वीकारल्यानंतर पुढच्या काही तासांमध्ये अनेक आदेशांवर सह्या करणार आहे असं सांगितलं होतं.

मान्यवरांची मांदियाळी

डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडला. डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून आणि जेडी वेन्स यांना उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ देण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस आणि एलॉन मस्क यांची खास उपस्थिती होती.

पुतिन यांनीही दिल्या शुभेच्छा

शपथविधी सोहळ्याच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही शुभेच्छा दिल्या. युक्रेन, तसंच अण्वस्त्रांबाबत नव्या अमेरिकेन सरकारशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेत आता सुवर्णयुग सुरु झालं आहे-डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच पहिल्या दिवशी २०० पेक्षा जास्त महत्वाच्या निर्णयांवर ते स्वाक्षरी करणार आहेत. ज्यामध्ये सीमा सुरक्षा, ऊर्जा यासह राष्ट्रीय सीमा आणीबाणी संदर्भातील निर्णयांचा समावेश आहे. याबरोबरच यूएस आर्मी आणि होमलँड सिक्युरिटीला दक्षिण सीमेचं संरक्षण करण्याच्या अनुषंगाने महत्वाचे निर्देश दिले जातील. अमेरिकेत आता सुवर्ण युग सुरु झालं आहे असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump takes oath as the 47th president of the united states of america scj