Donald Trump Warns India: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांची जगभर चर्चा होत आहे. खुद्द अमेरिकेतही काही गटांनी त्यांच्या निर्णयांवर टीका केली असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर काही देश त्यांना समर्थन देत असून काहींनी विरोध दर्शवला आहे. विशेषत: बेकायदा स्थलांतरीतांची घरवापसी आणि इतर देशांवर टेरीफ लागू करण्याची भूमिका. या मुद्द्यावरून सध्या ट्रम्प यांचे भारताशी संबंध काहीसे अडचणीत आले असताना त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी अमेरिकेतील संकेतस्थळ ‘ब्रेईटबार्ट न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर सविस्तर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर लागू करण्यात येणाऱ्या टेरिफवर भाष्य केलं.
“माझे भारताशी खूप चांगले संबंध आहेत, पण फक्त एक समस्या आहे. भारत हा जगातला सर्वाधिक टेरिफ दर आकारणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. मला विश्वास आहे की ते कदाचित आगामी काळात त्यांचे टेरिफ दर कमी करण्याची शक्यता आहे. पण २ एप्रिलपासून अमेरिकेकडून भारतावर तेवढेच दर आकारले जातील, जेवढे दर ते आमच्यावर आकारतात”, अशी ठाम भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी मुलाखतीमध्ये मांडली.
IMEC बद्दल नेमकी काय भूमिका?
दरम्यान, इंडिया-मिडल इस्ट-युरोप इकोनॉमिक कॉरिडॉर अर्थात आयएमईसीबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सकारात्मक भूमिका मांडली. “हा एक अतिशय उत्तम देशांचा समूह आहे. व्यापारविषयक बाबतीत आमच्या हितसंबंधांना धक्का लावणाऱ्या देशांचा सामना या गटाकडून केला जातो. व्यापार क्षेत्रात आमचे खूप खंबीर सहकारी आहेत”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मात्र, असं म्हणताना त्यांनी अमेरिकेचे हितसंबंध न जपणाऱ्यांविषयीची भूमिकाही स्पष्ट केली.
“आम्ही आमच्या अशा मित्रांना सोडू शकत नाही जे आम्हाला या बाबतीत वाईट वागणूक देतात. उलट आम्ही आमच्या मित्रांपेक्षा मित्र नसणाऱ्या राष्ट्रांच्या बाबतीत चांगली कामगिरी करत आहोत. जे आमचे मित्र नाहीत ते आमच्याशी काही बाबतीत मित्र असणाऱ्या राष्ट्रांपेक्षा चांगले वागतात. उदाहरणार्थ युरोपियन यूनियन. युरोपियन युनियनकडून आम्हाला व्यापाराच्या बाबतीत वाईट वागणूक मिळते”, असं ट्रम्प यांनी नमूद केलं.