Donald Trump Announces Arrest Of Kabul Airport Bomber : डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर ४४ दिवसांनी म्हणजेच आज (बुधवार, ५ मार्च) त्यांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या संसदेला (अमेरिकन काँग्रेस) संबोधित केलं. संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करताना ट्रम्प यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. तसेच कॅनडा, युरोपियन युनियन, भारत, चीन, ब्राझील व दक्षिण कोरिया या देशांवर वेगवेगळे आरोप केले. अमेरिकेतील विद्यमान सरकारचं कौतुक करत ते म्हणाले, “अनेक सरकारांनी चार किंवा आठ वर्षांच्या कार्यकाळात जितकं काम केलं नसेल तितकं काम आमच्या सरकारने मागील ४३ दिवसांत केलं आहे, तसेच यावेळी त्यांनी अमेरिकेला पुन्हा गौरवशाली राष्ट्र बनवण्याचा, युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘Make America affordable again’, असं म्हणत ट्रम्प यांनी देशातील महागाई कमी करण्यासंदर्भात घोषणा दिली. वाढलेल्या महागाईचं खापर त्यांनी यापूर्वीचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या डोक्यावर फोडलं. ते म्हणाले, “अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांचा कारभार अमेरिकेतील महागाई वाढण्यास कारणीभूत ठरला”.

ट्रम्प यांनी त्यांच्या दीड तासांच्या भाषणात भारतासह अनेक देशांवरील त्यांची नाराजी व्यक्त केली. आयात शुल्कावरून (टॅरिफ) अमेरिका जगभरातील विविध देशांशी संघर्ष करत आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी भारतावरील नाराजी उघड केली. या भाषणादरम्यान त्यांनी दोन वेळा भारताचा उल्लेख केला. ते म्हणाले, “भारत अमेरिकेवर १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादतो. ही चुकीची बाब आहे. आम्ही देखील आगामी २ एप्रिलपासून त्यांच्यावर आयात शुल्क लादू. इथून पुढे जो देश आमच्यावर आयात शुल्क लादेल, त्या देशावर आम्ही देखील तितकंच आयात शुल्क (Reciprocal Tariff) लादू. २ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.” याच मुद्यावरून त्यांनी अनेक राष्ट्रांना सुनावलं. ट्रम्प यांच्या भाषणात केवळ एका देशासाठी चांगले व गोड शब्द ऐकायला मिळाले. तो देश म्हणजे पाकिस्तान.

…अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे जाहीर आभार मानले

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिका इस्लामी कट्टरपंथी संघटना व दहशतवाद्यांविरोधात ठामपणे उभी आहे. साडेतीन वर्षांपूर्वी अमेरिकेचे लष्करी जवान अफगाणिस्तानमधील एक मोहीम संपवून परत येत असताना आयएसआयच्या दहशतवाद्यांनी काबूल विमानतळावर एक आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला. यामध्ये आपले १३ जवान शहीद झाले. कित्येक नागरिक त्या हल्ल्यात मारले गेले. आपल्या देशाच्या इतिहासातील तो एक काळाकुट्ट क्षण होता. मात्र, मला सांगायला आनंद होत आहे की त्या हल्याचा सूत्रधार व आयएसआयच्या दहशतवाद्याला आपण पकडलं आहे. त्याला आता आपण अमेरिकेत आणणार आहोत. त्याला आपल्या कायद्यानुसार शिक्षा सुनावली जाईल. त्या दहशतवाद्याला पकडण्यात पाकिस्तानच्या सरकारने आपली मदत केली. त्याबद्दल मी पाकिस्तानी सरकारचे आभार मानतो. त्या १३ कुटुंबांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा होता. मी त्या शहीदांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या भावना समजू शकतो.

Story img Loader