Donald Trump Threatens European Union : अमेरिकेत गेल्या महिन्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवत डोनाल्ड ट्रम्प यांनी दमदार पुनरागमन केले आहे. चार वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सतत कोणाला ना कोणाला धमक्या देत आहेत. आता ट्रम्प यांनी युरोपियन देशांना धमकावत अमेरिकेकडून तेल आणि गॅसची खरेदी केली नाही तर याचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवा, असे म्हटले आहे.
युरोपियन देशांनी त्यांना लागणारे बहुतांश तेल आणि गॅस अमेरिकेकडून खरेदी करावा. जर असे नाही झाले तर, सर्वत्र जादा कर आकारले जातील असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्याच मालकीचे असलेल्या ट्रूथ सोशल या प्लॅटफॉर्मवर, पोस्ट करत म्हटले की, “मी युरोपियन युनियनला सांगितले आहे की, त्यांनी त्यांची अमेरिकेबरोबर असलेली तूट भरून काढण्यासाठी आमच्याकडून तेल आणि गॅस मोठ्या प्रमाणात खरेदी करावे. अन्यथा सर्वत्र कराचा सामना करावा लागेल.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या २०१६ ते २०२० या मागील कार्यकाळातही, युरोप अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या पाठीवर स्वार आहे म्हणत, नाटोला अतिरिक्त निधी देणार नसल्याची धमकी दिली होती.
भारतालाही इशारा
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर लादण्याच्या त्यांच्या इशाऱ्याचा पुनरुच्चार केला आहे. ट्रम्प यांनी भारत जास्त कर आकारत असल्याचा दावाही केला आहे. याबरोबरच भारत अमेरिकेकडून तेवढेच कर आकरतो तेवढाच कर भारतावरही लादण्यात येतील असेही ट्रम्प म्हणाले आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह नऊ देशांचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ संघटनेला, अमेरिकन डॉलर कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्यास १०० टक्के आयात शुल्क लादण्यासह व्यापर बंद करण्याचा इशारा दिला होता. ‘ब्रिक्स’ संघटनेत भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश आहे.
हे ही वाचा : केमिकल टँकरचा भीषण स्फोट, ४ जणांचा होरपळून मृत्यू; महामार्ग ठप्प, कुठे घडली धक्कादायक घटना?
ऐतिहासिक विजय
काही दिवसांतच डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. १२० वर्षांहून अधिक काळानंतर पहिल्या टर्मनंतर पराभूत होऊन पुन्हा अमेरिकेचा अध्यक्ष होण्याचा विक्रम डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत आधी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बायडेन अशी लढत होणार होती. पण, अखेरच्या क्षणी जो बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर उपाध्यक्ष कमला हॅरिस मैदानात उतरल्या होत्या. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्यावर विजय मिळवत दमदार पुनरागमन केले.