वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून भारतावर आयातशुल्क लागू करणार असल्याची मंगळवारी घोषणा केली. ट्रम्प यांनी काँग्रेसमध्ये केलेल्या पहिल्या वार्षिक भाषणात भारत आणि इतर राष्ट्रांनी लादलेल्या उच्च आयातशुल्कावर टीका केली. हे आयातशुल्क अतिशय अन्याय्य असून या देशांवर परस्परशुल्क लागू करण्याची त्यांनी घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प यांनी मंगळवारी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांसमोर पहिले भाषण केले. त्यामध्ये त्यांनी अर्थव्यवस्था, स्थलांतरापासून जागतिक राजकारणापर्यंत अनेक मुद्दे उपस्थित केले. आपले सरकार लवकरच भारत आणि चीन यांसारख्या देशांवर परस्परशुल्क लागू करेल अशी घोषणा ट्रम्प यांनी केली.

ट्रम्प म्हणाले की, ‘‘आपल्यावरील आयातशुल्क फार अन्याय्य आहे. भारत आपल्यावर १०० टक्के इतके जास्त आयातशुल्क लादतो.’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांच्याबरोबरच्या भेटीत त्यांनी मोदी यांना आयातशुल्काच्या निर्णयाबद्दल सांगितले होते.

मित्र असो की शत्रू, आयातशुल्काच्या बाबतीत सर्व देश अमेरिकेवर अन्याय करतात असा दावाही ट्रम्प यांनी यावेळी केला. ते म्हणाले, ‘‘दुसऱ्या देशांनी अनेक दशकांपासून आयातशुल्क लादले आहे आणि आता आपली त्या देशांवर तितकेच आयातशुल्क लादण्याची पाळी आहे.’’

युक्रेन, रशिया शांततेसाठी तयार

वॉशिंग्टन : ‘‘रशिया शांतता प्रक्रियेसाठी तयार असून, तसे संकेत त्यांनी दिले आहेत. तसेच, युक्रेनच्या अध्यक्षांनीही चर्चेच्या टेबलावर पुन्हा येण्याची तयारी दर्शविली आहे आणि खनिजे, सुरक्षा यासंबंधी करार करण्याची तयारी दर्शविली आहे,’’ असे डोनाल्ड ट्रम्प यांनी या काँग्रेसमधील भाषणामध्ये सांगितले. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पाठविलेल्या पत्राचा त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, ‘‘गेल्या आठवड्यातील अतिशय स्फोटक बैठकीनंतर युद्धकाळातील अध्यक्षांना पुन्हा एकदा चर्चा करायची आहे. रशियाबरोबरदेखील गंभीरपणे चर्चा झाली आहे.’’

आकडेवारीत भारताबरोबरचा व्यापार

● २०२४मध्ये अमेरिकेचा भारताबरोबर वस्तूंचा व्यापार १२९.२ अब्ज डॉलर

● अमेरिकेची भारतात निर्यात ४१.८ अब्ज डॉलर (२०२३च्या तुलनेत ३.४ टक्के अधिक)

● भारताची अमेरिकेत निर्यात ८७.४ अब्ज डॉलर (२०२३च्या तुलनेत ४.५ टक्के अधिक)

● २०२४मध्ये अमेरिकेची भारताबरोबरच्या व्यापारातील तूट ४५.७ अब्ज डॉलर (२०२३च्या तुलनेत ५.४ टक्के अधिक)