US Teriffs on Venezuela Crude Oil: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या निर्णयांमुळे चर्चेत आले आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बेकायदा स्थलांतरितांना सक्तीने मायदेशी पाठवण्यापासून इतर देशांवर मोठ्या प्रमाणावर टेरीफ लागू करण्यापर्यंतच्या निर्णयांचा यात समावेश आहे. यासंदर्भात भारताबाबतही कठोर भूमिका घेण्याचे सूतोवाच त्यांनी आधीच केले असून आता त्यांच्या दुसऱ्या एका निर्णयाचा भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेमकं घडलंय काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्हेनेझुएलाकडून कच्चं तेल आयात करणाऱ्या देशांवर Secondary Teriff च्या नावाखाली नव्याने २५ टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जागतिक पटलावरील कमालीच्या अनिश्चित परिस्थितीमध्ये भारतानं एकाच देशावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या देशांकडून कच्चं तेल आयात करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. पण अमेरिकेच्या या इशाऱ्याचा भारताच्या या धोरणाला धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या २ एप्रिलपासूनच हे कर लागू केले जाणार आहेत.
“व्हेनेझुएलानं कायमच अमेरिकेच्या आणि अमेरिकेतील स्वातंत्र्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कच्चं तेल किंवा नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या कोणत्याही देशावर अमेरिकेशी होणाऱ्या व्यापारावर २५ टक्के कर आकारले जातील. यासंदर्भातली सर्व कागदपत्रे सही करून नोंद केली जातील. येत्या २ एप्रिलपासून नवे कर अंमलात येतील”, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये दिली आहे.
विद्यमान शुल्काव्यतिरिक्त नवे शुल्क
दरम्यान, फायनान्शियल टाईम्सच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यमान शुल्काच्या व्यतिरिक्त हे २५ टक्के कर असतील, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली आहे. एकदा लागू झाल्यानंतर हे कर वर्षभरासाठी लागू असतील.
भारतानं डिसेंबर २०२३ मध्ये जवळपास तीन वर्षांनंतर व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची आयात पुन्हा सुरू केली. त्यादरम्यान अमेरिकेनं व्हेनेझुएलावर लादलेले निर्बंध काही प्रमाणात कमी केले होते. पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच हे निर्बंध पुन्हा लादण्यात आले. मात्र, तरीही व्हेनेझुएलामधून काही प्रमाणात कच्चं तेल भारतासह इतर काही देशांमध्ये निर्यात होत होतं. विशेष म्हणजे २०२४ पर्यंत अमेरिका हा व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची आयात करणारा दुसरा मोठा देश होता. चीनमध्ये इथून सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात केली जाते.
भारताचं आयातीचं प्रमाण कमी, पण…
भारताची कच्च्या तेलाची एकूण आयात ही ४५ लाख बॅरल्स प्रतिदिन इतकी आहे. त्या तुलनेत व्हेनेझुएलाकडून भारताने ६५ बॅरल्स प्रतिदिन जानेवारीत तर ९३ हजार बॅरल्स प्रतिनिदन एवढं कच्चं तेल फेब्रुवारी महिन्यात आयात केलं होतं. त्यामुळे कच्च्या तेलासाठी भारताचं व्हेनेझुएलावरचं अवलंबित्व सध्या कमी आहे. पण भारतातली कच्च्या तेलाची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मावळत्या आर्थिक वर्षाची रेकॉर्ड पातळी भारत लवकर ओलांडण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी भारतानं ८७.७ टक्के कच्च्या तेलाची आयात केली. चालू आर्थिक वर्षात ती ८८.२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
अमेरिकेकडून सध्या व्हेनेझुएलावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जागतिक पातळीवरील तेल पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. पण त्याचा व्यापक परिणाम भारतातील दरवाढीमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या भारतीय कंपन्यांसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.