Donald Trump Decision: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून जगभरात त्यांची व त्यानी घेतलेल्या निर्णयांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी बेकायदा स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचं पाऊल उचललं, तर त्यानंतर इतर देशांवर सरसकट रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे जगभरातल्या शेअर बाजारात धूळधाण झाल्यानंतर ९० दिवसांसाठी त्यांनी तो स्थगित केला. पण आता त्यांच्या एका नव्या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या निर्णयाचा थेट गौतम अदाणींच्या अदाणी समूहाला फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं वॉल स्ट्रीट जर्नलच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यात ट्रम्प प्रशासन काही आर्थिक गुन्ह्यांसंदर्भातले नियम शिथिल करण्याची किंवा ते पूर्णपणे रद्दबातल करण्याची तयारी करत आहे. यामध्ये विदेशी कंपन्या वा व्यक्तींना लाच देणे, भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार, क्रिप्टो बाजारातील गैरव्यवहार यांचा समावेश आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सही केलेल्या ४२ निर्णयांपैकी एका निर्णयाची या घडामोडींना पार्श्वभूमी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तेव्हा अमेरिकेतली विधी विभागाला विदेशी कंपन्यांकडून व्यापारविषयक लाभ मिळवण्यासाठी लाच दिल्याप्रकरणातील अमेरिकन आरोपींविरोधातील कारवाया थांबवण्याचे आदेश दिले होते. विधी विभागाचे अॅटर्नी जनरल पॅम बाँडी यांना आर्थिक गुन्ह्यांवरून यंत्रणेचं लक्ष ड्रग्ज कार्टेल आणि आंतरराष्ट्रीय टोळ्यांवर केंद्रीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या धोरणाचा अदाणींना होणार फायदा?

दरम्यान, ट्रम्प प्रशासनाच्या या धोरणाचा भारतीय उद्योजक गौतम अदाणी यांच्या अदाणी समूहाला फायदा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ट्रम्प यांच्या आदेशांनुसार विधी विभाग एखाद्या व्यापारविषयक करारामध्ये ‘गुन्हा’ कशाला म्हणायचं? यावर खल करत आहे. यातून अमेरिकेतील कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना फायदा होईलच. पण त्याचबरोबर, अमेरिकन न्यायालयांमध्ये अशा प्रकारच्या आर्थिक गुन्ह्यांसाठी आरोप ठेवण्यात आलेल्या काही विदेशी कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही याचा फायदा होऊ शकतो. खुद्द अदाणी समूहाच्या काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांवर लाच दिल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील अझूर पॉवर कंपनीला मोठा दिलासा मिळणार आहे. या कंपनीनं सौरऊर्जा प्रकल्पांसंदर्भात अदाणी समूहाशी बांधा, वापरा व हस्तांतरीत करा स्वरूपाचा करार केला आहे. त्यामुळे व्यापारात अमेरिकेला फायदा मिळवून देण्यासाठी लाच दिली म्हणून आरोप असणाऱ्या या कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांची आरोपांतून सुटका होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकीकडे अदाणी समूहाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अमेरिकेतील विधि विभागाकडे त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द करावेत, अशी विनंती केल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलनं नमूद केलं आहे. पण खुद्द अदाणी समूहानं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.