US – Yemen War Updates: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय विशेष चर्चेत राहिले आहेत. त्यात इतर देशांवर टेरिफ लागू करण्यापासून बेकायदा स्थलांतरीतांना सक्तीने मायदेशी पाठवण्याच्या निर्णयांचा समावेश आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या भूमिकाही चर्चेचा तर कधी चेष्टेचा विषय ठरतात. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील एका अधिकाऱ्याने केलेल्या भलत्याच चुकीची चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं घडलं काय?

अमेरिकेकडून गेल्या काही दिवसांपासून येमेनमध्ये विविध ठिकाणी हवाई हल्ले केले जात आहेत. येमेनमधील हुती बंडखोरांविरोध अमेरिकेनं कंबर कसली असून हुतींना येमेनमधून नामशेष करण्याचा निर्धार ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे येमेनमधील हवाई हल्ल्यांबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा चालू असताना दुसरीकडे या हल्ल्यासंदर्भातलं सर्व नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गोपनीय चॅट ग्रुपवर नुकतंच असं काही घडलं की त्यामुळे ग्रुपवरील सर्वच उच्चपदस्थांना धक्का बसला!

येमेन हल्ल्यासंदर्भातील महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी बनवण्यात आलेल्या गोपनीय चॅट ग्रुपवर ट्रम्प यांच्या एका अधिकाऱ्याने चक्क एका ज्येष्ठ पत्रकाराला अॅड केलं. जेफरी गोल्डबर्ग असं त्यांचं नाव असून ते ‘दी अटलांटिक’ या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक आहेत. त्यामुळे युद्धासंदर्भात झालेल्या चर्चेतला काही गोपनीय हिस्सा हा गोल्डबर्ग यांच्यापर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

Houthi PC Small Group वर थेट उपाध्यक्षांपासून सर्व!

युद्धासंदर्भातील या ग्रुपमध्ये थेट अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स, संरक्षण सचिव पेट हेगसेथ, गृहसचिव मार्को रुबियो आणि राष्ट्रीय गुप्तचर खात्याच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड अशी अमेरिकन सरकारमधील अनेक महत्त्वाची मंडळी आहेत. या ग्रुपवर येमेन युद्धासंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयांबाबत चर्चा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आपल्याला ही बाब लक्षात येताच आपण तातडीने तिथे आलेली संवेदनशील माहिती आपल्या मोबाईलमधून डिलिट केल्याची माहिती गोल्डबर्ग यांनी दिली आहे. यात काही उच्चपदस्थ सीआयए अधिकारी आणि सध्या येमनसह इतर देशांमध्ये चालू असणाऱ्या अमेरिकेच्या कारवाया यासंदर्भातली माहिती होती, असा दावा गोल्डबर्ग यांनी केला आहे.

ट्रम्प म्हणतात, मला माहितीच नाही!

असा प्रकार घडल्याचं एकीकडे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते ब्रायन हयूजेस यांनी मान्य केलेलं असताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. “मी काही दी अॅटलांटिकचा मोठा चाहता नाही”, असंही त्यांनी मिश्किलपणे नमूद केलं.

लीक झालेल्या मेसेजेसमध्ये नेमकं काय?

दरम्यान, दी गार्डियनच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, या गोंधळामुळे बाहेर आलेल्या माहितीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक मार्गांच्या संरक्षणासंदर्भातील चर्चेचा तपशील होता. त्यानुसार, उपाध्यक्ष डी. व्हॅन्स यांनी अशा मार्गांच्या संरक्षणाची जबाबदारी अमरिकेनं घेणं अजिबात पटत नसल्याचं नमूद केलं. व्हेन्स यांच्या भूमिकेला अमेरिकेचे संरक्षण सचिव पेट हेगसेथ यांनी दुजोरा दिल्याचंही या तपशीलातून स्पष्ट होत आहे.

अशा प्रकारे गोपनीय माहिती बाहेर येण्याच्या प्रकारावर विरोधकांनी तीव्र शब्दांत टीका केली असून यासंदर्भात तातडीने कठोर पावलं उचलण्याची मागणी केली जात आहे.