वाईट लोकांना अमेरिकेबाहेर ठेवण्यासाठी सात मुस्लिमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेचा प्रवास करण्यापासून रोखण्यासाठी निर्बंध घालण्यात आल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. ‘प्रत्येकजण ही बंदी योग्य नसल्याचे सांगत आहे. तुम्हाला जे म्हणायचे आहे, ते म्हणा. पण वाईट लोकांना अमेरिकेबाहेर ठेवण्यासाठी असं करण्यात आल्याचे’, ट्विट त्यांनी केले आहे.
तत्पूर्वी व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव सीन स्पायसर यांनी ट्रम्प यांनी प्रतिबंध घातल्याचा दावा फेटाळला होता. ट्रम्प यांच्या वादग्रस्त आदेशानुसार इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
यापूर्वी आपल्या आदेशाचा बचाव करताना ट्रम्प यांनी ही मुस्लिमांवर बंदी नसल्याचे सांगत माध्यमे याचा चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असल्याचे म्हटले होते. ट्रम्प यांनी २७ जानेवारी रोजी या आदेशावर स्वाक्षरी केली होती. या आदेशानुसार सीरियाच्या निर्वासितांसहित सहा अन्य देशातील नागरिकांना अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या या निर्णयावर मोठी टीका करण्यात आली. ही मुस्लिमांवर बंदी नाही. ही धर्मावरही बंदी नाही. दहशतवादापासून आमच्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जगात ४० हून अधिक देश हे मुस्लिमबहुल आहेत. त्यांना या आदेशामुळे काहीच अडचण येणार नाही, असे ते म्हणाले.
९० दिवसांनंतर या आदेशाचे समीक्षण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. सीरियात गंभीर मानवी संकटाचा सामना करत असलेल्या लोकांप्रती मला दुख: आहे. परंतु माझी प्राथमिकता ही आमच्या देशाची सुरक्षा आणि त्यांना उत्तम सेवा देणे याला असेल. तसेच राष्ट्राध्यक्षाच्या नात्याने या पीडित लोकांच्या मदतीसाठी मी वेगळे मार्गही शोधेन. अमेरिका हे बाहेरील देशातील प्रवाशांसाठी एक गौरवशाली देश आहे. निर्वासिंताच्या प्रश्नाप्रती अमेरिकेला सहानभुती आहे. परंतु आपल्या देशातील नागरिक आणि सीमेच्या सुरक्षेला माझे प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा