Donald Trump Reciprocal Tariff on India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क (टॅरिफ) लागू केलं आहे. अमेरिकेने सर्व देशांवर सरसकट १० टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. तर, काही देशांवर Resiprocal Tariff (परस्पर आयात शुल्क) लागू केलं आहे. म्हणजेच जे देश आधीपासून अमेरिकेकडून कर वसूल करत आहेत त्या-त्या देशांकडून आता अमिरिकेने देखील तितकंच (किंवा त्या प्रमाणात) आयात शुल्क वसूल करण्यास सुरुवात केली आहे. यात भारताचाही समावेश आहे. अमेरिकेने भारतावर २६ टक्के, चीनवर ३४ टक्के, व्हिएतनामवर ४६ टक्के आयात शुल्क लागू केल्याचं वृत्त समोर आलं होतं.

दरम्यान, भारतावरील आयात शुल्क हे २६ टक्के नसून २७ टक्के असल्याचं अमेरिकेने स्पष्ट केलं आहे. व्हाइट हाऊसने एक अधिकृत आदेश जारी करून याची पुष्टी केली आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतावर २६ टक्के आयात शुल्क लागू करण्यात आलं होतं. मात्र, आता ट्रम्प प्रशासनाने एक अधिकृत आदेश जारी केला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की भारतावर अमेरिकेने २७ टक्के आयात शुल्क लागू केलं आहे.

भारत व पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

भारताबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “नवी दिल्ली आपल्याकडून खूप आयात शुल्क आकारत आहे.” या शुल्काबाबत ट्रम्प यांनी ‘खूप कठोर कर आकारणी’ असा उल्लेख केला आहे. ट्रम्प म्हणाले, “त्यांचे (भारत) पंतप्रधान अलीकडेच अमिरेकेला आले होते. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. मी त्यांना म्हणालो, की तुम्ही माझे चांगले मित्र आहात, परंतु, तुम्ही आमच्याबरोबर योग्य व्यवहार करत नाही. भारत आमच्याकडून ५२ टक्के आयात शुल्क आकारतो. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून अर्धं आयात शुल्क म्हणजेच २६ टक्के शुल्क घेणार आहोत. हा निर्णय घेणं खूप कठीण होता.

अमेरिकेने आयात शुल्काचे दर बदलले?

एकीकडे ट्रम्प यांनी भारताकडून २६ टक्के आयात शुल्क आकारण्याबाबत वक्तव्य केलं आहे, तर व्हाइट हाऊसने सरकारच्या अधिकृत दस्तऐवजांमध्ये भारताकडून २७ टक्के आयात शुल्क आकारण्याबाबतचा उल्लेख केला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्याकडून चुकून २६ टक्के उल्लेख झाला असावा असंही म्हटलं जात आहे. मात्र, इतर काही देशांकडून आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्कातही बदल केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे व्हाइट हाऊसने आयात शुल्कात बदल केल्याचं स्पष्ट आहे. अमेरिकेने भारताव्यतिरिक्त दक्षिण कोरिया, थायलंड, म्यानमार या देशांवरही आयात शुल्क लागू केलं आहे.

भारतासह इतरही काही देशांवर लागू केलेल्या आयात शुल्कात व्हाइट हाऊसने बदल केला आहे. या देशांची यादी खालीलप्रमाणे…

.देशघोषित आयात शुल्क (टक्क्यांमध्ये)बदललेलं आयात शुल्क (टक्क्यांमध्ये)
1भारत2627
2बोस्निया आणि हर्जेगोविना3536
3बोत्सवाना3738
4कॅमरून1112
5फॉकलंड बेटे4142
6म्यानमार4445
7थायलंड3637
8सर्बिया3738
9दक्षिण आफ्रिका3031
10दक्षिण कोरिया2526
11स्वित्झर्लंड3132