पीटीआय, वॉशिंग्टन

‘ब्रिक्स’ देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केल्यास १०० टक्के शुल्क लादण्याचा इशारा पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. डॉलरला पर्यायासाठी या देशांनी अन्य कोणत्या तरी भोळसट देशांचा शोध घ्यावा, असा सल्लाही ट्रम्प यांनी दिला आहे.

ट्रम्प यांनी गुरुवारी ‘ट्रुथ सोशल’ या स्वमालकीच्या समाजमाध्यम संदेशात सांगितले की, ‘ब्रिक्स’ देश डॉलरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु आमचे त्यांकडे लक्ष असल्याने त्यांनी तसा विचार करणे सोडून द्यावे. या देशांकडून हमी हवी, की ते नवीन ब्रिक्स चलन तयार करणार नाहीत किंवा बलाढ्य अमेरिकी डॉलरच्या जागी इतर कोणत्याही चलनाला समर्थन देणार नाहीत, अन्यथा त्यांना १०० टक्के शुल्कवाढीला सामोरे जावे लागेल किंवा अमेरिकेतील व्यापारास त्यांना अलविदा म्हणावे लागेल, असेही ट्रम्प म्हणाले. दरम्यान, भारत हा ‘ब्रिक्स’चा महत्त्वाचा सदस्य देश आहे. वेगळे चलन आणण्याचा ‘ब्रिक्स’चा कोणताही प्रस्ताव नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी डिसेंबरमध्ये स्पष्ट केले आहे.

जन्मसिद्ध नागरिकत्व’ गुलामांच्या मुलांसाठी

जन्मसिद्ध नागरिकत्व’ हे प्रामुख्याने वेठबिगार/गुलामांच्या मुलांसाठी आहे, जगभरातील लोकांना अमेरिकेत येण्यासाठी नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वाविरुद्ध कार्यकारी आदेश जारी केला. परंतु हा आदेश दुसऱ्याच दिवशी सिएटलमधील फेडरल कोर्टाने रद्द केला. याविरोधात अपील करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Story img Loader