Donald Trump Warns Iran Over Nuclear Deal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी रविवारी इराणला थेट धमकी दिली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार येत्या काही दिवसात अमेरिकेबरोबर अणु करार करा अन्यथा बॉम्बहल्ले आणि शुल्क वाढीला सामोरे जा असा कडक इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत इराण आणि अमेरिकेच्या अधिकार्‍यांमध्ये याबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती दिली मात्र याबद्दल अधिक खुलासा केला नाही. गेल्या आठवड्यात इराणने अमेरिकेचा थेट चर्चेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर ट्रम्प यांचे हे विधान समोर आले आहे.

“जर त्यांनी करार केला नाही, तर बॉम्ब हल्ले होतील. त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नसतील असे बॉम्बहल्ले होतील,” असे ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजशी बोलताना सांगितले .

इतकेच नाही तर ट्रम्प यांनी कर वाढीबद्दल देखील इराणला इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले की, “जर त्यांनी करार केला नाही तर शक्यता आहे की मी त्यांच्यावर दुय्यम कर (secondary tariffs) लावेल, जसेकी मी चार वर्षांपूर्वी केले होते.”

ट्रम्प यांनी तेहरानला यापूर्वी पत्र लिहिले आहे आणि त्यांच्या देशाने वाटाघाटी करून अणु करार पूर्ण करावा अशी विनंती केली आहे. पण इराणने ओमानच्या माध्यमातून त्या पत्राला उत्तर दिले आहे. ज्यामध्ये त्यांनी वॉशिंग्टनला कळवले आहे की, दबावाच्या माध्यमातून अमेरिकेशी थेट वाटाघाटी न करण्याचे त्यांच्या देशाचे धोरण आहे.

इराणाचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान (Masoud Pezeshkian) यांनी देशाच्या धोरणाचा पुनरुच्चार करताना सांगितले की, “आम्ही थेट वाटाघाटी (अमेरिकेशी) फेटाळल्या आहेत, पण इराण नेहमीच अप्रत्यक्ष वाटाघाटींमध्ये सहभागी झाला आहे, आणि आता देखील सर्वोच्च नेत्याने अप्रत्यक्ष वाटाघाटी सुरू राहतील यावर भर दिला आहे,” असे रॉयटर्सने म्हटले आहे.

देशावर बॉम्ब हल्ले करण्याच्या धमकीबरोबरच ट्रम्प यांनी इराणवर दुय्यम कर लादण्याचा इशारा देखील दिला आहे. ज्यामुळे इराणच्या वस्तू खरेदी करणार्‍यांवर याचा परिणाम होईल. ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यातच व्हेनेझुएलाविरुद्ध दुय्यम कर लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.

२०१६ ते २०२० या कार्यकाळात ट्रम्प यांनी इराण आणि जागतिक शक्ती यांच्यातील २०१५ साली करण्यात आलेल्या करारातून माघार घेतली होती. याद्वारे इराणवरील बंधने कमी करण्याच्या बदल्यात त्यांच्या वादग्रस्त अणु कारवायांवर कठोर बंधने घालण्यात आली होती.