Donald Trump Warns Vladimir Putin : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना थेट इशारा दिला आहे. युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाने जर युद्धविरामाचा प्रस्ताव नाकारला तर त्यांच्यावर टोकाचे निर्बंध लादले जातील असे म्हटले आहे.
आयर्लंडचे पंतप्रधान मायकल मार्टिन यांच्याशी व्हाईट हाऊस येथे भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, युक्रेनने ३० दिवसांच्या युद्धविरामाच्या कराराला संमती दर्शवल्यानंतर दुसर्याच दिवशी संभाव्य युद्धविरामाच्या चर्चेसाठी अमेरिकेचे अधिकारी मध्यस्थीसाठी रशिया येथे जात आहेत. मात्र ट्रम्प यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली नाही. त्यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे देखील या आठवड्याच्या अखेरीस मॉस्कोला जाणार असल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले.
ट्रम्प म्हणाले की, “आम्ही रशियाशी खूप वाईट वागू शकतो. हे रशियासाठी हे खूप विनाशकारी असेल. पण मला ते करायचे नाही कारण मला शांतता हवी आहे आणि कदाचित आम्ही काहीतरी साध्य करण्याच्या जवळ पोहोचलो आहोत”.
तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन-युद्धाबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले की, “सध्या आपण बोलत असताना लोक रशिया येथे जात आहेत आणि आशा आहे की, आपण रशियाकडून युद्धबंदी मान्य करून घेऊ आणि जर आपण ते करू शकलो तर भीषण रक्तपात थांबवण्याकडे आपली ८० टक्के वाटचाल पूर्ण झालेली असेल.”
युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांच्याबरोबर झालेल्या त्यांच्या विस्फोटक चर्चेच्या दोन आठवड्यानंतर ट्रम्प यांनी रशियाला हा इशारा दिला आहे. झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात युद्धाच्या मुद्द्यावर व्हाईट हाऊस येथे ही चर्चा झाली होती. दोन नेत्यांमधील या चर्चेनंतर ट्रम्प यामंनी युक्रेनला दिली जाणारी लष्करी मदत आणि गुप्तचर माहिती थांबवली होती. मात्र मंगळवारी युक्रेनने युद्धविराम प्रस्तावाला सहमती दिल्यानंतर ही मदत पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये सौदी अरेबिया येथे मंगळवारी चर्चा झाल्यानंतर झेलेन्स्की यांनी युद्धविरामाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. यावेळी त्यांनी अमेरिकेने रशियाला हा प्रस्ताव मान्य करायाला लावला पाहिजे असेही ते म्हणाले होते. “युक्रेन या प्रस्तावाचे स्वागत करतो, आम्ही याला सकारात्मक समजतो, आम्ही असे पाऊल उचलण्यासाठी तयार आहोत. हे करण्यासाठी अमेरिकेला रशियाला पटवून द्यावे लागेल. म्हणून आम्ही सहमत आहोत, आणि जर रशियन सहमत झाला तर त्या क्षणी युद्धबंदी लागू होईल” असे ते म्हणाले होते.