Donald Trump wealth : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे वर्षभरापूर्वी अनेक कायदेशीर खटल्यांचा सामना करावा लागला. यादरम्यान ट्रम्प यांनी फोर्ब्सच्या २०२५ च्या अब्जाधिशांच्या यादीत ५.१ अब्ज डॉलर्स संपत्तीसह ७००वा क्रमांक मिळवला आहे. अवघ्या १२ महिन्यांपूर्वी ट्रम्प यांचे आर्थिक भविष्य अंधारात दिसत होते, कायदेशीर अडचणी आणि ४५४ दशलक्ष डॉलर्सच्या फसवणुकीचा निर्णयाच्या ओझ्याखाली ट्रम्प बुडाल्याचे दिसून येत होते. मात्र फोर्ब्सच्या मते, गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीत ट्रम्प यांची संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे.
२०२४ मध्ये न्यूयॉर्क कोर्टाने अनुकूल ‘क्रेडिट टर्म्स’ मिळवण्यासाठी त्यांची संपत्ती वाढवून दाखवल्या प्रकरणी निकाल दिल्यानंतर ट्रम्प यांच्या आर्थिक अडचणींना सुरूवात झाली होती. न्यूयॉर्क अटॅर्नी जनरल लेटिशीया जेम्स यांनी त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे संकेतही दिले होते, ज्यामध्ये त्यांच्या प्रसिद्ध ४० वॉल स्ट्रीट इमारतीचा देखील समावेश होता. एका वेळी ट्रम्प यांचे अंदाजे कॅश बॅलन्स अवघे ४१३ दशलक्ष डॉलर्स इतके होते. या काळात ट्रम्प यांचं भविष्य अनिश्चित दिसत होतं.
पण ट्रम्प यांनी या सर्व गोष्टींचा जोरदार प्रतिकार केला. त्यांच्या कायदेशीर टीमने कोर्टाला त्यांची मालमत्ता जप्त होण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक बॉन्डची रक्कम ४५४ दशलश डॉलर्सवरून १७५ दशलक्ष डॉलर्स पर्यंत खाली आणण्यासाठी तयार केले, ज्यामुळे ट्रम्प यांना मार्ग शोधण्यासाठी वेळ मिळाला.
ट्रूथ सोशलने तारले
त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलची मूळ कंपनी ‘पब्लिक’ केली. जेमतेम उत्पन्न आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून देखील ट्रम्प यांच्या कट्टर समर्थकांनी या कंपनींच्या शेअर्सवर उड्या घेतल्या, ज्यामुळे कंपनीचे शेअर्स एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहचले. पुढे जरी कंपनीचे शेअर्स ७२ टक्क्यांनी घसरले असले, तरीही मार्च २०२५ पर्यंत ट्रम्प यांच्याकडे कंपनीचा २.६ अब्ज डॉलर्सचा हिस्सा होता, ज्यामुळे त्यांच्या संपत्तीत उल्लेखनीय वाढ झाली.
क्रिप्टोची कमाल
यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक अनपेक्षित क्षेत्र गेम चेंजर ठरले. ऑक्टोबर २०२४ मध्ये ट्रम्प यांनी नवशिक्या गुंतवणूकदारांसाठी वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल हा एक क्रिप्टो प्रोजेक्ट लाँच केल. सुरुवातीच्या काळात अनिश्चितता होती पण ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणूक जिंकल्याने आणि क्रिप्टो उद्योजक जस्टिन सन यांनी केलेल्या प्रचारामुळे या क्रिप्टो प्रोजेक्टचं मूल्य प्रचंड वाढलं. यामुळे ट्रम्प यांच्या संपत्तीत २४५ दशलक्ष डॉलर्सची भर पडली.
डोनाल्ड ट्रम्प हे एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी $TRUMP हे डिजीटल टोकन सादर केलं. ज्याचा त्यांना भरपूर फायदा झाला. ज्यामधून त्यांनी फी म्हणून ३५० दशलक्ष डॉलर्स मिळवले, ज्यापैकी कर वजा होऊन ट्रम्प यांच्या तिजोरीत ११० दशलक्ष डॉलर्स पडल्याचे बोलले जाते. २०२४ च्या अखेरीस ट्रम्प यांना क्रिप्टोकरन्सी व्हेंचरमधून जवळपास ८०० दशलक्ष डॉलर्स इतकी लिक्विडीटी मिळाली. ज्यामुळे ट्रम्प हे एका प्रकारे अनेकांच्या नजरेत क्रिप्टो किंग बनले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीचे स्त्रोत वाढले असले तरी त्यांना ४५४ दशलक्ष डॉलर्सच्या फसवणुकीच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. पण व्याज जमा होत असल्याने आणि एकूण रक्कम ५०० दशलक्ष डॉलर्सच्या जवळपास असल्याने त्यांना कायदेशीर परिणामांची चिंता उरलेली नाही. जवळपास ८०० दशलक्ष डॉलर्सची लिक्विड मालमत्ता असल्याने ट्रम्प सध्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहेत .
फोर्ब्सची यादी
फोर्ब्स २०२५ च्या अब्जाधीशांच्या यादीत विक्रमी ३,०२८ अब्जाधीशांचा समावेश आहे. या यादीतील सर्वांची मिळून एकत्रित संपत्ती ही १६.१ ट्रिलियन डॉलर्स इतकी प्रचंड आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या तुलनेत ट्रम्प यांची संपत्ती अजूनही कमीच आहे. अंदाजे ३४२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मस्क यांनी यादीत अव्वल स्थान कायम ठेवले आहे.