Donald Trump Swearing in Ceremony : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या सोहळ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प आता काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत महत्त्वाच्या निर्णयावर ट्रम्प भर देणार आहेत. तसेच निवडणुकीच्या प्रचारात डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी भर देणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, राष्ट्रध्यक्षपदाचा शपथविधी सोहळा संपताच डोनाल्ड ट्रम्प नेमकी कोणते मोठे निर्णय घेतात? याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे ४७ वे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेण्याच्या आधी ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या सभेत त्यांच्या समर्थकांना संबोधित केलं होतं. त्यामध्ये त्यांनी आपण निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणार असल्याचं सांगितलं होतं. आता अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिकेत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती सांगितली जाते आहे. यामध्ये प्रामुख्याने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या मोहिमेचा मुद्दा असेल किंवा अमेरिकन शक्ती आणि समृद्धी व सन्मानासाठी महत्वाचे निर्णयाविषयी निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प कोणते निर्णय घेण्याची शक्यता?
वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच पहिल्या दिवशी २०० पेक्षा जास्त महत्वाच्या निर्णयांवर ते स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये सीमा सुरक्षा, ऊर्जा यासह राष्ट्रीय सीमा आणीबाणी संदर्भातील निर्णयांचा समावेश असू शकतो. याबरोबरच यूएस आर्मी आणि होमलँड सिक्युरिटीला दक्षिण सीमेचं संरक्षण करण्याच्या अनुषंगाने महत्वाचे निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे.
या बरोबरच यूएस सरकारच्या कामकाजात काही मूलभूत सुधारणा आणि अमेरिकेत कार्यरत असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांचा नायनाट करण्यासह दक्षिणेकडील सीमा सुरक्षित करण्यासाठी निर्देश देण्यासाठी ट्रम्प प्राधान्य देण्याची शक्यता आहे. याबरोबरच सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी सीमा बंद करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प करण्याची शक्यता आहे. गुन्हेगारी टोळ्यांचा नायनाट करण्यासाठी ते काही एजन्सींच्या अधिकाऱ्यांसह एक टास्क फोर्स तयार करण्याची शक्यता आहे. याबरोबरच सीमेवर भिंत बांधण्याचे काम सुरू ठेवण्याच्या सूचना लष्कराला देण्यात येण्याची शक्यता आहे.