पीटीआय, वॉशिंग्टन
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी रिपब्लिकन पक्षांतर्गत निवडणूक ‘न्यू हॅम्पशायर रिपब्लिकन प्रायमरी’मध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन निक्की हेली यांचा पराभव केला. ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाकडून आपल्या उमेदवारी निश्चितीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी ५ नोव्हेंबरच्या निवडणुकीत जो बायडेन यांच्याशी ट्रम्प यांची पुन्हा संभाव्य अंतिम लढत होण्याची चिन्हे आहेत.
तीन चतुर्थाश मतांच्या मोजणीसह ट्रम्प ५५ ते ४४ टक्क्यांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत केवळ दोन राज्यांमध्ये अशा निवडणुकांचे मतदान झाले असले तरी, ट्रम्प यांच्या मंगळवारच्या प्राथमिक विजयाने रिपब्लिकन पक्षावरील त्यांचे वर्चस्व अधोरेखित केले. ट्रम्प यांनी गेल्या आठवडय़ात आयोवाच्या ‘कॉकस’मध्ये दणदणीत विजय मिळवला होता. ट्रम्प यांच्याविरुद्ध ९१ गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत. त्यात २०२० च्या अध्यक्षीय निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. असे असताना त्यांनी मिळवलेला हा विजय उल्लेखनीय आहे. परंतु दक्षिण कॅरोलिनाचे माजी प्रांतपाल आणि संयुक्त राष्ट्रातील राजदूत, ५२ वर्षीय हॅली यांनी मंगळवारी रात्री समर्थकांना एक धडाकेबाज भाषण देऊन लढण्याची शपथ घेतली. त्यांनी ट्रम्प यांच्या मानसिक तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि रिपब्लिकनांना इशारा दिला की ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी पुन्हा उमेदवारी दिल्यास पक्षाचा पराभव होईल.