US Presidential Election 2024 Result: जागतिक महासत्ता अमेरिकेच्या चाव्या नेमक्या कुणाच्या हाती जाणार, याची गेल्या महिन्याभरात जोरदार चर्चा पाहायला मिळाली. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडसाद जगभरात उमटणं साहजिक असून त्यानुसार अवघ्या जगाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेत मतदानाला सुरुवात झाली. बुघवारी पहाटे मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी १ च्या सुमारास निकाल स्पष्ट झाले. रिपब्लिकन पक्षाला अमेरिकेत बहुमत मिळालं आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमत मिळालं आहे. ओहियोमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य शेरॉड ब्राऊन यांचा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार बर्नी मोरेनो यांच्याकडून पराभव झाला. त्याआधी वेस्ट व्हर्जिनियाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जिम जस्टिस यांनी सहज विजय मिळवल्यानंतर या दोन जागांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. विस्कॉन्सिन, पेनसिल्वानिया आणि मिशिगन या ठिकाणी डेमोक्रॅटिक पक्षाकडून कडवी झुंज पाहायला मिळाली.

US Election Results 2024 Live Updates: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

जिम जस्टिस यांच्या विजयामुळे डेमोक्रॅटिक पक्षाकडची वेस्ट व्हर्जिनियाची जागा रिपब्लिकन पक्षाकडे आली. त्याशिवाय टेक्सास आणि फ्लोरिडातील टेड क्रुझ व रिक स्कॉट या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे डेमोक्रॅट्सचे प्रयत्न धुळीला मिळाले.

अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचा केला उल्लेख

“आता आपण आपला देश कधीच नव्हता इतका उत्तम बनवणार आहोत. हे यश आपल्या सगळ्यांना एकत्र आणणार आहे. आपल्याला सर्व समस्या सोडवायच्या आहेत. आपण सगळे मिळून अमेरिकेला पुन्हा महान बनवू शकतो. त्यामुळे मला हे संगण्यात अतिशय आनंद होतोय की हे करणं ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मी तुमचा अपेक्षाभंग करणार नाही. अमेरिकेचं भविष्य आणखी विशाल, आणखी चांगलं, आणखी श्रीमंत आणि आणखी सामर्थशाली असेल. देव तुम्हा सर्वांवर कृपा करो”, असं डोनाल्ड ट्रम्प आपल्या विजयी भाषणात म्हणाले.

“नवा तारा, एलॉन मस्क!”

दरम्यान, या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांचा ‘नवा तारा’ असा उल्लेख करत त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानले. फ्लोरिडात झालेल्या वेस्ट पाम बीच परिसरात ट्रम्प यांनी केलेल्या भाषणात त्यांनी एलॉन मस्क यांचा उल्लेख केला. “आपल्याकडे एलॉन मस्क यांच्या रुपात एक नवा तारा आहे. ते अत्यंत हुशार आहेत. आपल्या अशा हुशार लोकांचं आपण जतन केलं पाहिजे. असे खूप कमी लोक आहेत”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

“मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या भवितव्यासाठी मी प्रत्येक दिवशी लढत राहीन. जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे, तोपर्यंत मी लढत राहीन. समर्थ, सुरक्षित आणि वैभवशाली अमेरिका घडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हा अमेरिकेचा सुवर्णकाळ असणार आहे. अमेरिकन नागरिकांसाठी हा मोठा विजय असणार आहे. यामुळे अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याची संधी आपल्याला मिळणार आहे”, असंही डोनाल्ड ट्रम्प यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump wins us election 2024 to become american president kamala harris defeated pmw