Donald Trump Wishes For Diwali And Assured Hindus : अमेरिकेत मतदानाची तारीख जवळ आलेली असताना आता अमेरिकेत स्थायिक झालेल्या परदेशी नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिवाळीच्या निमित्ताने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना शुभेच्छा देऊन भारत आणि अमेरिकेतली भागीदारी अधिक मजबूत करण्याचे आश्वासित केले. त्यांनी एक्स पोस्टवरून भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

“हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवरील रानटी हिंसाचाराचा मी तीव्र निषेध करतो. त्यांच्यावर जमावाकडून हल्ले होत आहेत आणि बांगलादेशमध्ये लूट केली जात आहे, यामुळे अराजकता निर्माण झाली आहे. हे माझ्या काळात कधीच घडले नसते. कमला आणि जो यांनी जगभरातील आणि अमेरिकेतील हिंदूंकडे दुर्लक्ष केले आहे. इस्रायल ते युक्रेन आणि आमच्या स्वतःच्या दक्षिण सीमेपर्यंत आपत्ती ठरले आहेत, परंतु आम्ही अमेरिकेला पुन्हा मजबूत बनवू आणि सामर्थ्याने शांतता परत आणू!” असं आश्वासन डोनाल्डट ट्रम्प यांनी भारतीयांना दिलं.

हेही वाचा >> विश्लेषण : अमेरिकेत मतदानासाठी केवळ ‘नोव्हेंबरचा पहिला मंगळवार’ हाच दिवस का? कारण व्यावहारिक की धार्मिक?

“कट्टरपंथी डाव्यांच्या धर्मविरोधी अजेंड्यापासून आम्ही हिंदू अमेरिकनांचेही संरक्षण करू. आम्ही तुमच्या स्वातंत्र्यासाठी लढू. माझ्या प्रशासनात, आम्ही भारत आणि माझे चांगले मित्र पंतप्रधान मोदी यांच्याशी आमची उत्तम भागीदारी मजबूत करू. कमला हॅरिस तुमचे छोटे व्यवसाय अधिक नियम आणि उच्च करांसह नष्ट करतील. याउलट, मी कर कमी केले, नियमात कपात केली आणि इतिहासातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था तयार केली. आम्ही ते पुन्हा करू, पूर्वीपेक्षा मोठे आणि चांगले करू. आम्ही अमेरिकेला पुन्हा ग्रेट बनवू”, असंही ते म्हणाले.

“तसेच सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मला आशा आहे की प्रकाशाचा सण वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून देईल!” अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

५ नोव्हेंबर रोजी अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरीस आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत अटीतटीची लढाई सुरू आहे. ‘नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी’ कोण बाजी मारणार याची जगभरात उत्सुकता लागली आहे.