Donald Trump tells Putin to Stop : युक्रेनची राजधानी किव्ह या शहरावर क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून प्राणघातक हल्ला असून यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच युक्रेनवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन देखील केले आहे. रशिया शांतता करारासाठी तयार असल्याचे सूचित करणारे विधान केल्याच्या काही काळानंतरच ट्रम्प यांनी ही टीका केली आहे.

रशियाने युक्रेनच्या राजधानीला लक्ष करत केलेल्या अत्यंत विनाशकारी हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प त्यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ट्रम्प यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. “किव्हवरील रशियन हल्ल्यांबद्दल मी खूष नाही,” असे ट्रम्प म्हणाले आहेत.

तसेच ट्रम्प यांनी हा हल्ला गरज नसलेला तसेच अत्यंत चुकीच्या वेळी करण्यात आल्याचे त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांनी ‘व्लादिमिर, स्टॉप!’ असा इशाराही यावेळी दिली आहे. “आठवड्याला ५००० सैनिक मृत्युमुखी पडत आहेत. चला शांतता करार पूर्ण करूया!” असे आवाहनही ट्रम्प यांनी यावेळी केले आहे. विशेष म्हणजे रशिया युक्रेनबरोबर शांतता करार करण्यासाठी तयार असल्याचे विधान ट्रम्प यांनी केले होते, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुतिन यांना हा संदेश दिला आहे. दरम्यान क्रेमलिनकडून अद्याप ट्र्म्प यांच्या टीकेला उत्तर देण्यात आलेले नाही.

ट्रम्प यांनी हा करार पूर्ण होण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हे अडचण ठरत असल्याचेही म्हटले होते. तसेच त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये झेलेन्स्की यांच्यावर प्रक्षोभक विधाने केल्याचा आरोपही केला होता.

ओव्हल ऑफिसमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, “आपल्याला झेलेन्स्की यांच्याबरोबर करार करावा लागेल, मला वाटले होते की झेलेन्स्की यांच्याशी तडजोड करणे सोपे जाईल. पण आत्तापर्यंत तरी ते कठीण गेले आहे”. ट्रम्प यांच्या या विधानानंतर काही तासांमध्येच रशियाने किव्हवर हल्ला केला, ज्यामध्ये किमान ८ जणांचा मृत्यू झाला तर ७० जण जखमी झाले.

या हल्ल्यानंतर झेलेन्स्की यांनी गुरुवारी त्यांचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा आटोपता घेतला आणि ते मायदेशी परतले. दरम्यान गुरुवारी किव्हवर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना झेलन्स्की म्हणाले की, “रशिया लोकांना ठार करत आहे आणि वाढता दबाव आणि यासाठीची जबाबदारी झटकून टाकत आहे. दुर्दैवाने येथे प्रचंड विनाश झाला आहे. बचावकार्य सुरू आहे, इमारतींचे ढिगारे बाजूला केले जात आहेत.”