US Tariff Comes in Effect in India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विविध देशांवर व्यापार कर लादले आहेत. त्यानुसार, भारतावरही २६ टक्के कर आकारण्यात आला आहे. भारतात या कराच्या अंमलबजावणीला आजपासून सुरुवात झाली असून भारताकडून अद्यापतरी यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु, येत्या काळातील परिस्थितीचा अभ्यास करून सरकार यावर प्रतिक्रिया देईल, अशी अपेक्षा असल्याचं वृत्त रॉयटर्सने एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलं आहे. दरम्यान, भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
जागतिक व्यापार संघटनेनुसार भारताचा सरासरी कर १२ टक्के
अमेरिकेबरोबर वाटाघाटी करण्याच्या दृष्टीने भारताने लक्ष केंद्रित केलं आहे. भारतावर अचानक २६ टक्के कर लादल्याने अनिश्चितता निर्माण झाली आहे. इतर राष्ट्रांवर लादण्यात आलेल्या करांपेक्षा भारतावर लादण्यात आलेला कर तुलनेने कमी आहे. ट्रम्प यांनी शेअर केलेल्या चार्टनुसार, भारतावर एकूण ५२ टक्के व्यापार कर लादण्यात आला आहे. हा आकडा वादग्रस्त आहे. जागतिक व्यापार संघटनेने भारताचा सरासरी कर १२ टक्क्यांच्या जवळ ठेवला आहे, त्यामुळे अमेरिकन प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर चर्चा
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात सोमवारी फोनवर चर्चा झाली. त्यानुसार, या दोन देशांमधील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३ एप्रिल रोजी भारतासह सुमारे ५० देशांवर नवीन शुल्क लादण्याची घोषणा केल्यानंतर भारताने पहिल्यांदा अमेरिकेशी संवाद साधला होता.
एक्सवर या चर्चेची माहिती देताना जयशंकर म्हणाले की, व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या महत्त्वावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. या कॉलमध्ये विविध धोरणात्मक मुद्द्यांचाही समावेश होता. दोन्ही नेत्यांनी इंडो-पॅसिफिक, भारतीय उपखंड, युरोप, मध्य पूर्व आणि कॅरिबियनमधील घडामोडींवर चर्चा केली.