Zelenskyy Trump Meeting: युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये माध्यमांसमोरच जाहीर खडाजंगी झाली. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहेत. मात्र झेलेन्स्की यांच्या काही भूमिकांबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत त्यांना हुकूमशहा म्हटले होते. शुक्रवारी व्हाईट हाऊसमधील बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांचा पाणउतारा करत ते शांततेच्या करारासाठी तयार असतील तेव्हाच आपल्यात बोलणी होईल, असे सुनावले. यानंतर आता झेलेन्स्की अमेरिकेच्या बाहेर लंडन येथे पोहोचताच एक्सवर सविस्तर पोस्ट टाकून आपली भूमिका मांडली आहे.

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी तीन वर्षांच्या युद्धादरम्यान संपूर्ण मदत दिल्याबद्दल अमेरिकेचे आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. “दुर्मिळ खनिज करारावर स्वाक्षरी करण्यास आम्ही सहमती दर्शविली आहे. अमेरिकेने आम्हाला वेळोवेळी पाठिंबा दिला आहे, पण तो पुरेसा नाही, आम्हाला त्याहून अधिक हवे आहे”, असेही झेलेन्स्की म्हणाले.

झेलेन्स्की पुढे म्हणाले, “आम्ही खनिज करारावर स्वाक्षरी करण्यासाठी तयार आहोत. सुरक्षा हमीच्या दिशेने टाकलेले ते पहिले पाऊल असेल. पण एवढेच पुरेसे नाही, यापेक्षा आम्हाला अधिक हवे आहे. कोणत्याही हमीशिवाय रशियाशी केलेली युद्धबंदी ही युक्रेनसाठी जोखमीची ठरेल. आम्ही तीन वर्षांपासून लढत आहोत. त्यामुळे अमेरिका आमच्याबाजूने आहे. हा विश्वास युक्रेनच्या लोकांना मिळायला हवा.”

“अमेरिकेने पाठिंबा दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, संसद आणि अमेरिकेच्या जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करतो. युक्रेनच्या जनतेने या पाठिंब्याबद्दल नेहमीच अमेरिकेचे कौतुक केले आहे. विशेषतः तीन वर्ष आक्रमणादरम्यान अमेरिका युक्रेनच्या पाठिशी राहिली”, असे झेलेन्स्की म्हणाले.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर आमचे संबंध हे फक्त दोन नेत्यांपुरते मर्यादीत नाहीत. तर ते ऐतिहासिक आणि दोन देशातील लोकांमधील स्नेहाशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे मी नेहमीच अमेरिकेची प्रशंसा करत आलो आहे, असेही ते म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची माध्यमांसमोरच खडाजंगी झाली. पाहा व्हिडीओ

Story img Loader