Donald Trump Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे सूत्रं हाती घेतल्यापासून अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या काही प्रमुख निर्णयांमध्ये नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क), बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा, अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा निर्णयासह अनेक देशांवर अतिरिक्त व्यापारी कर लादण्याच्या निर्णयांचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या निर्णयांचा फटका जगभरातील अनेक देशांना बसला आहे. एवढंच नाही तर ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील अनेक देशांच्या शेअर बाजारातही मोठे परिमाण पाहायला मिळाले आहेत.

जगभरातील अनेक देशांवर टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय वर्तुळातून तीव्र पडसाद उमटत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मोठा धक्का दिला आहे. चीनमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर १०४ टक्के इतका मोठा कर लादण्याची घोषणा ट्रम्प प्रशासनाने केली आहे. या निर्णयाची व्हाईट हाऊसने पुष्टी केली असून ८ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून हे नवीन शुल्क लागू होणार आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

अमेरिकेने चीनवर १०४ टक्के कर लादल्याच्या निर्णयाची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. दरम्यान, अमेरिकेने आधी चीनवर ३४ टक्के आयात शुल्क लावलं होतं. मात्र, अमेरिकेने चीनवर लादलेल्या या ३४ टक्के आयात शुल्कानंतर चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर ३४ टक्के आयात शुल्क लावण्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, चीनने अमेरिकेच्या वस्तूंवर ३४ टक्के आयात शुल्क लावण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला होता की चीनने ८ एप्रिलपर्यंत ३४ टक्के कर मागे घेतला नाही तर अमेरिका ५० टक्के अतिरिक्त कर लादेल.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीपुढे चीनने झुकण्यास नकार दिला. तसेच जशास तसे उत्तर देण्याची भूमिका चीनने घेतली होती. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मोठा धक्का देत चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर १०४ टक्के इतका मोठा कर लादण्याची घोषणा केली आहे. मार्चमध्ये २० टक्के कर आणि गेल्या आठवड्यात ३४ टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आज थेट ५० टक्के अतिरिक्त कर लादण्याच्या घोषणेमुळे चिनी आयातीवरील एकूण कर १०४ टक्क्यांवर पोहोचले आहेत.

ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर देताना चीनने काय म्हटलं होतं?

अमेरिकेनंतर चीननेही प्रत्युत्तरादाखल अमेरिकेवर ३४ टक्के आयात शुल्क लादले. हे आयात शुल्क मागे घेण्याकरता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला अल्टिमेटम दिला असून असे न केल्यास चीनवर ९ एप्रिलपासून ५० टक्के आयात शुल्क लादण्याचा इशारा दिला होता. अमेरिकेच्या या इशाऱ्याला चीननेही प्रत्युत्तर दिलं होतं. “टॅरिफ ब्लॅकमेल”ला चीन घाबरणार नाही”, असं चीनने म्हटलं होतं. “चीनविरुद्ध शुल्क वाढवण्याची अमेरिकेची धमकी ही एक चूक आहे. यामुळे अमेरिकेची ब्लॅकमेलिंगची सवय पुन्हा एकदा स्पष्ट होतेय, जर अमेरिकेने आयात शुल्क मागे घेतले नाहीत तर चीन शेवटपर्यंत लढेल,” असे चीनच्या मंत्रालयाने म्हटलं होतं.